जालना : आंतरवाली सराटीतील (Antarwali Sarathi) दगडफेकीच्या घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या ऋषिकेश बेदरेला पोलिसांनी अटक करून, त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त केली आहे. दरम्यान, त्यानंतर पोलिसांकडून सुरु असलेल्या चौकशीत आता आणखीन काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ऋषिकेश बेदरेचे पोलीस रेकॉर्डवरील वेगवेगळी गंभीर गुन्हे यातून समोर येत आहे. ऋषिकेश बेदरेवर 2009 ते आजपर्यंत 14 ते 15 गुन्हे दाखल आहे. बीड (Beed), जालना (Jalna), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या हद्दीत दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, लूटमार, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करून कट रचने, अट्रोसिटी, दारू विक्रीसह जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या मराठा आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घटनेतील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे याला काल जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी बीड जिल्ह्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. तसेच त्याची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, जीवे मारण्याच्या उद्देशाने कट रचून दगडफेक केल्याचा आरोप असलेला ऋषिकेश बेदरे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होता. या आंदोलनादरम्यान घडलेल्या दगडफेक, जाळपोळ आणि लाठीचार्जच्या घटनेनंतर तब्बल दोन महिने 25 दिवसांनी पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन साथीदारांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तर, अंबड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीनही आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल


पोलिसांच्या या कारवाईनंतर मराठा आंदोलनातील ऋषिकेश बेदरे सहभागावरती वेगवेगळ्या शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. याशिवाय मनोज जरांगे यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सक्रिय असलेल्या ऋषिकेश बेदरे याची नेमकी आंदोलनात भूमिका काय होती? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. तर, मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ऋषिकेश बेदरेची वाळू पट्ट्यात दहशत असून, त्याच्यावर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. यात दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लूट करणे, दारू विक्री, जुगार, बदनामी करणे यासह इतर अनेक कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.


मनोज जरांगेंची प्रतिक्रिया


आंतरवाली सराटीच्या मराठा ॲक्शन आंदोलनामध्ये ऋषिकेश बेदरेचा मोठा सहभाग होता. लाठीमारच्या घटनेपूर्वी 'एबीपी माझा'कडे असलेल्या एका व्हिडिओमध्ये ऋषिकेश बेदरे छगन भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळतो. याशिवाय पुढच्या संपूर्ण आंदोलनामध्ये तो मनोज जरांगे यांच्या आजूबाजूला पाहायला मिळतो. अनेक फोटोमध्ये आणि दृश्यांमधून जरांगे आणि बेदरे एकमेकांना बोलताना दिसत आहेत. तर, याच घटनेबाबत जरांगे यांचू भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आंतरवाली सराटी प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेली अटक सरकारचा डाव असल्याचे” जरांगे यांनी म्हटले आहे. 


आंदोलनात उपद्रवी लोकं घुसल्याच्या दाव्याला पृष्टी मिळतेय का? 


आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर उद्भवलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमध्ये अनेक उपद्रवी लोकं घुसल्याची तक्रार मराठा नेते करत होते. तसेच, मनोज जरांगे यांनी जाळपोळ आणि दगडफेक करणारी आपले आंदोलक नसल्याचं देखील सांगितलं होतं.  मात्र, या आंदोलनातील सक्रिय सहभागी असलेल्या आरोपीकडे आढळून आलेले गावठी पिस्तुल आणि त्याचा गुन्हेगारीचा इतिहास पाहता, या आंदोलनात उपद्रवी लोकं घुसल्याच्या दाव्याला पृष्टी मिळताना पाहायला मिळतेय.


इतर महत्वाच्या बातम्या: 


 अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण, प्रमुख आरोपीसह दोघांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी