Agriculture News : परंपरागत पिकांना बगल देत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा रेशीम लागवडीकडे (Silk Cultivation) कल वाढला आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) चांगला फायदा होत आहे. दरम्यान, जालना (Jalna) येथील मार्केटमध्ये रेशीमची आवक वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात येथील रेशीम बाजारात तब्बल 38 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या फक्त दोन महिन्यात 7 कोटी 23 लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत.
2018-2019 रोजी अस्तिवतात आलेल्या जालना कृषी उत्पन्न बजार समितीमधील या रेशीम मार्केटमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा बोलबाला आहे. राज्यातील मोजक्या रेशीम मार्केटमध्ये गेल्या 5 वर्षात जालना रेशीम मार्केटचा लौकिक वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ, मराठवाड्यासह गुजरात राज्यातूनही शेतकरी रेशीम विक्रीसाठी जालन्याच्या मार्केटमध्ये येत आहेत. अनेक शेतकरी रेशीम लागवडीतून मिळणाऱ्या मिळकतीवर खुश आहेत.
प्रतिदिन सरासरी 3 टन कोषांची आवक
आज शेतकऱ्यांना जालना कृषी उत्पन्न बजार समितीमध्ये सरासरी 500 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहे. मागील महिन्यात 760 रुपये किलो एवढा उचांकी भाव मिळाला होता. सध्या प्रतिदिन सरासरी 3 टन कोषांची या बाजारात आवक होत आहे. रेशीम मार्केट सुरु झाल्यापासून आर्थिक उलाढालीचा आलेख दरवर्षी वाढताना पाहायला मिळत आहेत.
कोणत्या वर्षी किती उलाढाल?
1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या वर्षात 4 हजार 872 शेतकऱ्यांकडून 429 टन कोष खरेदीमधून 12 कोटींची उलाढाल झाली.
1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंतच्या आर्थिक वर्षात एकूण 5 हजार 200 शेतकऱ्यांकडून 462 टन कोषाची खरेदी झाली, ज्यातून 24 कोटींची उलाढाल झाली.
1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यत चालू वर्ष संपण्याच्या एक महिना अगोदरच 8 हजार 228 शेतकऱ्यांच्या 718 टन कोष खरेदीमधून तब्बल 38 कोटींची ठिकाणी उलाढाल झाली.
जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2023 या अवघ्या दोन महिन्यात 1 हजार 200 शेतकऱ्यांकडून 122 टन कोष खरेदीमधून 7 कोटी 23 लाखांची उलाढाल झाली आहे.
जालना जिल्ह्यात रेशीम लागवड क्षेत्रात वाढ
मराठवाडा विदर्भातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जवळची आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने तुलनात्मकदृष्ट्या लागवड क्षेत्रात सुद्धा भर पडली आहे. एकट्या जालना जिल्ह्यात मागील वर्षी 853 एकर क्षेत्रावर रेशीम लागवड झाली होती. त्यात आत भर पडून हे क्षेत्र 1 हजार 400 एकरवर गेलं आहे.
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
सध्या इतर शेती मालाच मार्केट डाऊन झालं आहे. अनेक पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. मात्र, रेशीम उत्पादक शेतकऱ्याला सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. रेशीमचे भाव मागच्या महिन्यापेक्षा काहीसे कमी झाले असले तरी समाधानकारक असल्याने रेशीम उत्पादक शेतकरी आनंदी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: