जालना : जालना शहरात 15 वर्षीय मुलाचं अपहरण करुन चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून अवघ्या पाच तासात मुलाला शोधून काढण्यात यश मिळवलं. स्वयंम महावीर गादिया असं अपहृत मुलगा दहावी इयत्तेत शिकत असून त्याचे वडील व्यावसायिक आहेत. मंठा चौफुली परिसरातील पोदार शाळेच्या परीक्षा सेंटरवरुन कारमधून त्याचं अपहरण झाल्याचं समजतं. 


असं झालं अपहरण
शहरातील व्यावसायिक महावीर गादिया यांचा 15 वर्ष वयाचा मुलगा स्वयंम हा गोल्डन ज्युबिली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. तो बुधवारी (18 मे) सकाळी दहावीची परीक्षा देण्यासाठी पोदार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला. दुपारी साडेबारा वाजता पेपर सुटल्यानंतर तो आपल्या चालकाच्या गाडीत बसला. पुढे काही अंतर गेल्यावर तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कारमध्ये प्रवेश केला आणि गाडी अंबड गावच्या दिशेने वळवली. साडेबारा वाजता परीक्षा संपूनही स्वयंम परत आला नाही. त्यामुळे पालकांनी चालकाच्या मोबाईल फोनवर कॉल केला. परंतु यावेळी चालकाऐवजी अज्ञात व्यक्तीचा आवाज होता. मुलगा हवा असल्यास चार कोटी रुपये आणून द्या, अश मागणी अपहरणकर्त्यांनी केली. यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. 


असा सापडला स्वयम
अपहरणकर्त्यांनी चालकाच्या मोबाईलवरुन व्यावसायिक महावीर गादिया यांना फोन करुन चार कोटीच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम घेऊन त्यांनी अंबड इथे बोलावले, शिवाय त्यांनी एकटे येण्याची देखील अट घातली. मात्र महावीर गादिया यांनी आपल्या भावाला सोबत घेण्याची आरोपींना विनंती केली जी त्यांनी मान्य केली. दरम्यान पोलिसांत तक्रार दिल्यानंतर महावीर गादिया यांचा भाऊ म्हणून एक पोलीस त्यांच्या गाडीत बसला. शिवाय गुप्तरित्या काही पोलीस महावीर गादिया यांच्या संपर्कात होते. दुसरीकडे आरोपी वेळोवेळी त्यांचे लोकेशन बदलत होते. शेवटी अंबड रोडवरील शहापूर गावाजवळ आरोपींना पोलीस आपला पाठलाग करत असल्याचा संशय आला. त्यामुळे गाडीतील एकेक आरोपी रस्त्यात उतरले त्यानंतर पोलिसांनी या लोकेशनवर स्वयम आणि चालक आढळून आले.


ड्राइव्हर संशयाच्या भोवऱ्यात
पोलिसांनी या प्रकरणात चालकाला ताब्यात घेतले असून तीन अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या प्रकरणात ड्रायव्हरवर पोलिसांची संशयाची सुई आहे. कारण स्वयम कुठे आहे, त्याचा पेपर किती वाजता सुटणार, याची अचूक माहिती आरोपींना कशी मिळाली? त्याच्या संपर्कात ड्राइव्हर होता का? या प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक देखील स्थापन केले आहे.


पोलिसांनी काय माहिती दिली?
"आज दुपारी अडीचच्या सुमारास 15 वर्षीय मुलाचं पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या समोरुन अपहरण झाल्याची तक्रार मिळाली. माहिती मिळताच आम्ही संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंद केली. मुलाला गाडीमध्ये घेऊन जाणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपींचा शोध सुरु आहे. चालक आमच्या ताब्यात असून तपास सुरु आहे," अशी माहिती जालन्याच्या प्रभारी पोलीस अधीक्षक आर रागासुधा यांनी दिली.