Jalgaon: आपण आतापर्यंत 20 ते 22 बोटं असलेली मुलं पाहिली असतील, मात्र, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात मध्य प्रदेशातील महिलेने तब्बल 26 बोटांच्या बाळाला जन्म दिला आहे. या नवजात बाळाला दोन्ही  हाताला एक-एक तर, दोन्ही  पायाला तब्बल दोन-दोन बोटं जास्त आहेत. या दुर्मिळ घटनेमुळे डॉक्टरांसह सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.


मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील झिरन्या येथे राहणाऱ्या ज्योती बारेला (वय 20) नावाच्या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने मध्यरात्री यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास 
ज्योती बारेला यांची प्रसूती झाली. मात्र ज्या बाळाचा जन्म झाला होता, ते पाहून डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचारी, तसेच बाळाचे नातेवाईक यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 26 बोटं असलेल्या या बाळाला पाहून सर्वच अवाक झाले, ही वैद्यकीय इतिहासातील  दुर्मिळ घटना असल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जात आहे.


या घटनेवर सर्वांनी आश्चर्य व्यक्त करण्यामागचं कारणही मोठं होतं. असं पाहता सामान्यतः हातापायाचे मिळून 20 बोटं असतात, पण जळगावात जे बाळ जन्माला आलं त्याच्या हातापायाला तब्बल 26 बोटं आहेत. या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटं आणि दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटं असे एकूण 26 बोटं आहेत. विशेष म्हणजे या बाळाला जन्म देणारी आई आणि बालक हे दोघे सुखरूप असून दोघांची प्रकृती चांगली आहे. न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळले, परिचारिका कोमल आदिवाले, सुमित बारसे, सरला परदेशी, पौर्णिमा कोळंबे, अरुण पाटील यांनी या महिलेची सुखरुप आणि यशस्वी प्रसूती केली. 


बालकाला पाहण्यासाठी रुग्णालयात झाली मोठी गर्दी


आतापर्यंत आपण 21 किंवा 22 बोटं तसेच 24 बोटं असलेली मुलं जन्माला आली असल्याचं ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल, मात्र तब्बल 26 बोटांचं बाळ जन्माला येणं ही वैद्यकीय इतिहासातील अतिशय दुर्मिळ घटना आहे, असे मत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कौस्तुभ तळले आणि सावदा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश चौधरी यांनी व्यक्त केले. 26 बोटं असलेले बाळ जन्माला आल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरातील सर्व गावांमध्ये पोहोचली आहे, त्यामुळे  या दुर्मिळ म्हटल्या जाणाऱ्या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.


हेही वाचा:


Pune Crime News : किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवं वळण; माजी नगरसेवकानेच रचला हत्येचा कट