Jalgaon Mahapalika : जळगाव शहराच्या (Jalgaon) विकासासाठी आणलेल्या निधीच्या श्रेयवादावरून शिवसेना (shivsena) ठाकरे गट तसेच भाजप नगरसेवकांमध्ये आजच्या महापालिकेच्या महासभेत मोठी खडाजंगी उडाली. रस्त्याच्या कामाचा निधी एकमेकांच्या वार्डात वळवल्याचा आरोप दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकमेकांवर केल्याने महासभेत (Mahasabha) मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं.


जळगाव महापालिकेची (Jalgaon Mahapalika) महासभा पार पडली. यावेळी शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामावरून आणि निधी वरून नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी इतरही नगरसेवकांनी अनेक दिवसापासून रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असताना कामे होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. 'आमचे आमदार, आमचे मंत्री' यांनी निधी 100 कोटींचा निधी मंजूर केल्याचे भाजपचे नगरसेवक डॉ. आश्विन सोनवणे यांनी यावेळी सांगितले. तसेच तुमच्या मंत्र्यांनी निधी मंजूर केल्यानंतर नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात निधी वळवून घेतल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. 


भाजपचे नगरसेवक डॉ. आश्विन सोनवणे यांनी आरोप केल्यानंतर त्यावरून नगरसेवक आश्विन सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यात खडाजंगी झाली. मंत्री आमदार हे फक्त भाजपचे नसून ते जळगाव शहराचे पण आहेत, अस प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिले. त्यावरून दोघांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. नगरसेवकांच्या या गोंधळामुळे शांत व्हा असे सांगूनही तसेच परवानगी न घेता नगरसेवक बोलत असल्याने महासभेच्या अध्यक्षा तथा महापौर जयश्री महाजन यांनी महासभेची काही शिस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तसेच शिस्त पाळावी, शांतता ठेवावी असे महापौर जयश्री महाजन यांनी नगरसेवकांना खडसावले. त्यांनतर नगरसेवक शांत झाले. नगरसेवकांच्या खडाजंगीमुळे यावेळी महासभेत मोठा गोंधळ उडाल्याच पाहायला मिळालं.


महापौरांनी नगरसेवकांना सुनावले.... 


जळगाव महानगरपालिका नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. वर्षभरापूर्वी उपमहापौर यांच्या वक्तव्यावरून महासभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला होता. तत्कालीन उपमहापौरांनी रावण हा श्रीरामांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. यावेळी उपमहापौरांनी जाहीर माफी मागावी, अशी भूमिका भाजपच्या सदस्यांनी घेतल्याने वातावरण तापले होते. त्यानंतर आजच्या महापालिकेच्या महासभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडण्यात आल्या. त्यावरून महासभेत गोंधळ होऊन महापौरांनी यावेळी सगळ्यांनाच धारेवर धरले.