जळगाव : राज्यात 12 वी नंतर आता 10 वीच्या देखील परीक्षा (Exam) सुरू झाल्या असून कॉपीमुक्त अभियानासाठी सरकार व प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, तरीही अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपीच्या माध्यमातून मदत करण्यात येत असल्याचं दिसून येतं. त्यातच, जालना जिल्ह्यात 10 वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याची घटना घडली होती. मात्र, पेपर फुटला नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डान दिले आहे. तर दुसरीकडे चक्क शाळेतील शिक्षकच रिक्षात बसून गाईडमधून उत्तरे लिहीत असल्याचा एक व्हिडिओ जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, याप्रकरणी चौकशी केली असता संबंधित व्हिडिओ कुठला आणि व्हिडिओतील शिक्षक व शिक्षिका कोण आहेत, याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये, एक मुख्याध्यापिका असून दोन शिक्षक आहेत. या सर्वांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने काही शिक्षक हे उत्तर लिहून देण्याच्या तयारीत असल्याचा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका रिक्षात बसून एक शिक्षक आणि दोन महिला शिक्षकांकडून हा कॉपीचा गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. आता, व्हायरल व्हिडिओच्या चौकशीनंतर व्हिडिओतील शिक्षिका व शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षात बसून कॉपी पुरविण्याच्या तयारीत असलेल्या दोन शिक्षिका आणि एका शिक्षकाची क्लिप काल जळगावमधील सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्र बाहेरची ही क्लीप असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कॉपी पुरविण्याच्या तयारीत असलेल्या दोन शिक्षिकांमध्ये एक महिला शिक्षक या सरदार वल्लभाई पटेल  विद्यालयाच्या मुख्याध्यापक असल्याचे समोर आले. तर, अजून एक शिक्षकही यामधे प्रश्न संचातून उत्तरे शोधून ती परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुरविण्याच्या उद्देशाने तयारी करत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. या व्हिडिओमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अशा शिक्षिकांवर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. 


दरम्यान, या क्लिपचा तपास केला असता इयत्ता दहावीच्या मराठीच्या पेपरच्या दिवशी हा प्रकार झाला असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .


व्हिडिओत काय दिसते?


महिला पुस्तकातून उत्तर शोधून विद्यार्थ्याला एका कागदावर लिहून देत असल्याचं या क्लिपमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ कोणत्या गावाचा आहे, किंवा कॉपी करण्यासाठी ही उत्तर लिहून घेतले जात आहे का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राजवळील ही क्लिप असल्याचं सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.  विशेष म्हणजे रिक्षात बसलेल्या महिला चक्क प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम यांसह उत्तरे शोधून लिहित असल्याचे दिसून येते. त्यांच्या हाती नवनीतचे गाईडही पाहायला मिळते, म्हणूनच नवनीत हाती आले हो, शिक्षकासोबत कॉपी केली हो.. असाच हा प्रकार म्हणता येईल.


हेही वाचा


परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय!