Raver Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


आज श्रीराम पाटील यांनी हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti 2024) हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.  तसेच रक्षा खडसे पाच लाख मतांनी निवडून येणार, असे भाजपचे नेते सांगत आहेत, यावरही त्यांनी भाष्य केले आहे. 


रावेरची लढाई माझी एकट्याचीच नव्हे तर...


श्रीराम पाटील यांनी म्हटले आहे की, आपण आजच हनुमानाचे दर्शन घेऊन आलो आहोत. विजयाचे साकडे आपण हनुमानाला घातले असून ही लढाई आता माझी एकट्याची नाही तर जनतेची आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता ही लढत आनंददायी आणि सोपी झाल्यासारखं वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग 


शरद पवार (Sharad Pawar) हे आपल्यासाठी जळगावमध्ये येऊन गेले. त्यांनी मागील काळात शेतकरी आणि जनतेसाठी भरपूर कामं केली आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. त्यांनी निवडलेले चिन्ह हे विजयाचं प्रतिक आहे, असेही श्रीराम पाटील यांनी म्हटले आहे. 


संतोष चौधरी आमच्यासोबत आल्याने मोठा आनंद  


रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी आमदार संतोष चौधरी (Santosh Chaudhary) यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अचानक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे संतोष चौधरी नाराज होते. याबाबत श्रीराम पाटील म्हणाले की, माजी आमदार संतोष चौधरी यांची नाराजी दूर होईल, असा आपल्याला विश्वास होता. ते पुन्हा आमच्यासोबत आल्याचा मोठा आनंद आपल्याला झाला आहे. ते आल्याने ताकद नक्कीच वाढली आहे. 


त्यांनी 2009 चा पेपर विचारात घ्यावा


रक्षा खडसे यांना पाच लाखांनी लीड मिळेल, अस त्यांचे नेते सांगत असले तरी त्यांनी 2009 चा पेपर त्यांनी विचारात घ्यायला हवा. मग काय ते त्यांना कळेल, असे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे भाजपा वाटेवर असल्याचे विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे आमचे नेते राहिले आहेत. त्यांच्याबाबत बोलण्या इतका मी मोठा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


'एकनाथ खडसेंची उणीव भासणार, पण रावेरमध्ये लढेंगे और जीतेंगे', रोहिणी खडसेंचे सतीश पाटलांना उत्तर!


'मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही'; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ