Sanjay Raut: या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
Maharashtra Politics: संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरुन राऊतांची जोरदार टीका. लाडकी बहीण योजनेवर टीका
जळगाव: महायुती सरकारने राज्याला बदनाम केले आहे. मंत्रालयात घुसून या लोकांच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत. तशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणा, पण विधानसभा निवडणुकीत जनता बरोबर बटण दाबेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
विधानसभेला आपल्याला प्रत्येक जागा निवडून आणायची आहे. त्यासाठी जळगावने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही स्वाभिमानाची लढाई आहे. महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे. राज्य वाचले तर मराठी माणूस वाचेल, असेही राऊत यांनी म्हटले. या पक्षाने आम्हाला सगळं दिलं, त्याचे इमान आम्ही राखले पाहिजे. पण याच पक्षात आमदारांनी गद्दारी करून बेइमानी करून कलंक लावला आहे. हा कलंक धुतला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे 100 बापही शिवसेना चोरु शकणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
येथील गद्दाराला गाडण्यासाठी वाघ आला आहे. येथील आमदाराच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी चिठ्ठी आली आहे. 50 कोटी सोडून पाच वर्षात यांनी केलेल्या मालमत्तेच्या चौकशीबाबत चिठ्ठीत लिहल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
बदलापूरच्या घटनेवर संजय राऊतांची सरकारवर टीका
राज्यात चित्र काय आहे हे बदलापूरमधील घटनेतून दिसत आहे. या राज्यात लाडकी बहीण योजना आणि आणि त्याचा जोरात प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महिलांची अब्रू लुटली जात आहे. नरेंद्र मोदी या विषयामध्ये बोलायला तयार नाहीत. फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याची भाषा बोलतात. मात्र महिलांना न्याय मिळत नाही, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र, अनेक राज्यांना त्याला ब्रेक लावला. पंतप्रधान मोदींच्या नावाने बहुमत मिळवता आले नाही. दिल्लीत हुकूमशाही सुरु आहे. अमित शाह आणि मोदी चोऱ्यामाऱ्या करुन सत्तेवर आले. लोकशाहीत लोकांच्या मताला किंमत असते. यांनी लाडका शेतकरी, लाडका बाप योजना आणली, आता लाडका गद्दार योजनाही आणावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. राज्यातील जनता या सरकारला पुन्हा निवडून देणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप