Rohini Khadse : काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निकालापर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. मात्र भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांकडून भिंतींवर पक्षाचे चिन्ह रंगवून ठेवण्यात आले आहे. तसेच खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो दिसून येत आहे. हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केला आहे.
केंद्र सरकार स्वतःची जाहिरात करण्यासाठी एवढं पुढे गेलं की, खतांच्या बॅगा आणि शहराच्या भिंती रंगून ठेवल्या आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने आचारसंहितेचा भंग होते त्या ठिकाणी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो
रोहिणी खडसे म्हणाल्या की, आपण पाहिले तर आजूबाजूच्या परिसरात भिंतीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पक्षाचे चिन्ह भिंतीवर रंगवले आहेत. तसेच खतांच्या बॅगांवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फोटो दिसून येत आहे. मी एका खत विक्रेत्याच्या दुकानात गेले असता त्या खत विक्रेत्यांना अशी चिंता आहे की, आता आचारसंहिता सुरु आहे.
निवडणूक आयोगाने कारवाई करावी
पंतप्रधान मोदींच्या फोटोला झाकायचे कसे? फोटो झाकला नाही तर आचारसंहितेचा भंग होणार. म्हणजे स्वतःची जाहिरात करण्यासाठी केंद्र सरकार एवढे पुढे गेलेले आहे की, खतं सोडली नाहीत, भिंती सोडल्या नाहीत, त्यांनी ठिकठिकाणी सरकारचा पैसा वापरून जाहिराती केलेल्या आहेत. हा नागरिकांचा पैसा आहे. या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. यावर निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी यावेळी केली आहे.
आचारसंहिता काळात 'या' कामांवर बंदी
आचारसंहिता काळात सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास मनाई असते. धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश काढता येत नाहीत. परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत. निवडणुकीचा प्रचार करताना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. कुठल्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी करता येत नाही.
आणखी वाचा