जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.  तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) भाजपकडून स्मिता वाघ (Smita Wagh) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आज रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी जळगावात मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 


जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांनी सकाळीच आपापले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावडे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील, उमेश नेमाडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भरले. यानंतर रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ जळगावात जाहीर सभा पार पडली.  


आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की - रक्षा खडसे


जाहीर सभेत रक्षा खडसे म्हणाल्या की, आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की. कारण  एवढ्या उन्हात आपण सर्वांनी मला आणि स्मिताताईंना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. समोरचे आज कितीही मुद्दे घेऊन सांगत असतील की दहा वर्षांत आम्ही काही केलं नाही. पण या जनतेला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही या  जिल्ह्यात काय काम केले आहेत. ही निवडणूक फक्त खासदार निवडून देण्यासाठी नाही तर देशाच्या निकासाठी आहे. त्यामुळे आपण सर्वानी संकल्प करायचा आहे की निवडणूक फक्त रक्षाताई आणि स्मिताताई यांना जिंकवण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहेत, असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.


जनतेला कळतं, कुणाला मत द्यायचं कुणाला नाही - स्मिता वाघ


स्मिता वाघ म्हणाल्या की, ही जनता मला नक्कीच निवडून आणेल, असं मला या ठिकाणी विश्वास आहे. आज सगळ्या विरोधकांनाही लक्षात येईल की त्यांनी काल आम्हाला आव्हान केलं होतं. आमच्यावर वाटेल तसे ओरडले होते, पण जनता ही सुसंस्कृत आहे. ‘जनतेला कळतं, कुणाला मत द्यायचं कुणाला नाही, असे मत स्मिता वाघ यांनी व्यक्त करत येणाऱ्या १३ तारखेला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले.


आणखी वाचा 


त्यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, एका जागेवर ठप्प पडून; फडणवीसांनी डागली तोफ