Jalgaon Train Accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पुष्पक एक्स्प्रेसला (Pushpak Express Fire) आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याची धक्कादायक घटना घडली. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून उड्या मारल्या होत्या. मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने (Karnataka Express) अनेकांना चिरडले. यात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जखमी झाले आहेत. जखमींवर जळगाव आणि पाचोरा येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अपघातातील एका मृत व्यक्तीबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे.   


पुष्पक एक्स्प्रेसने लखनऊ येथून बाबू खान नामक 27 वर्षीय युवक मुंबईकडे येत होता. त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. त्याच्या नातेवाईकांना समाज माध्यमात आलेल्या व्हिडिओवरून बाबू खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचे नातेवाईक मुंबईहून जळगाव येथे पोहोचले आहेत. मात्र, बाबू खान यांचा मृतदेह आगारात न मिळता वैद्यकीय महाविद्यालयाच्या ॲनाटोमी विभागात ठेवल्याचे दिसून आलं. 


बाबू खान यांच्या मृत्यूबाबत प्रशासन अनभिज्ञ


बाबू खान यांच्या मृत्यूबद्दल प्रशासनाला अद्याप कुठलीही माहिती नसल्याचे यामुळे समोर आले आहे. अशाच प्रकारे अनेक बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक जळगावात पोहोचलेले आहेत. बाबू खान यांच्या मृत्यूची माहिती प्रशासनाने अद्यापही नातेवाईकांना दिलेली नाही. मात्र, मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात असल्याचे आढळून आलंय. आता रेल्वे अपघाताच्या घटनास्थळाची पोलीस, महसूल विभाग, रेल्वे कर्मचारी आणि पाचोरा नपा कर्मचाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अजूनही अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. 


13 मृतांपैकी 7 जणांची ओळख पटली


1. कमला नवीन भंडारी (43, नेपाळ, हल्ली मुक्काम कुलाबा ), 


2. लच्छीराम खमू पासी (40, नेपाळ) 


3. इम्तियाज अली (35, उत्तरप्रदेश) 


4. नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी (19, उत्तरप्रदेश) 


5. जवकला भटे जयकडी (80, नेपाळ) 


6. हिनू नंदराम विश्वकर्मा (10, नेपाळ) 


7. बाबू खान (27 वर्षे, उत्तरप्रदेश)


रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे सोपवणार


दरम्यान, जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत सात मृतांचे शवविच्छेदन झाले आहे. या सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केले जातील आणि त्यानंतर ते नातेवाईकांना सुपूर्द केले जाणार आहे. हे मृतदेह दूरचे असल्याने जवळपास पाच ते सहा दिवस त्यांच्या गावी जाण्यासाठी लागू शकतात. त्यामुळे सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात येतील, अशी माहिती जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Jalgaon Train Accident: सून मृत सासूला सावरत असताना चोरट्यांची हातसफाई; जळगावमध्ये नेपाळच्या महिलेसोबत काय घडलं?


Jalgaon Train Accident: ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती