Sharad Pawar:  राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना दुसरीकडे नव्या समीकरणांबाबत चर्चा सुरू आहेत. अशातच नेत्यांच्या भेटीबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गुलाबराव पाटील एकाच कोचममधून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात बंड करताना राष्ट्रवादीकडून (NCP) शिवसेना (Shiv Sena) संपवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता, त्याच बंडखोर गटातील मंत्री गुलाबराव पाटील हे शरद पवार यांच्यासोबत दिसल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे मत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेतून सोबत प्रवास करताना दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे 16 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर/ कार्यशाळेचे शरद पवार यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे, यावेळी शरद पवार हे एक दिवसीय शिबीरास ते मार्गदर्शन करणार आहेत.


या कार्यक्रमासाठी गुरुवारी शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत गाडीत बसले. यादरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा दिसून आले. गुलाबराव पाटील व शरद पवार एकाच डब्यातून प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.


सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शरद पवार व मंत्री गुलाबराव पाटील या  दोघांमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा झाल्याचे कळते. दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासात दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली की, नाही ? याबाबत मात्र नेमकं कळू शकले नाही.


राजकीय विषयांवर चर्चा नाहीच...


मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आज योगायोगाने शरद पवार यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मिळाली. पाणी टंचाई ,कृषी समस्या आदी विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा झाल्या. त्यांनी आपल्याकडून समस्या जाणून घेतल्या, आनंद वाटला, मात्र कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे पाटील यांनी म्हटले. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याशिवाय एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे आपण त्यांचं ऐकणं काम आहे असं पाटील यांनी म्हटले. 


गुलाबरावांचे मंत्रीपद धोक्यात?


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याआधी शिवसेना शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. या पाच मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. गुलाबराव पाटील यांना वगळण्यात येणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे पाटील यांनी पवारांसोबत बराच वेळ चर्चा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.