जळगाव : एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडानंतर जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंड पुकारल्यानंतर आता या मतदारसंघात त्यांचेच कट्टर समर्थक तथा उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढे आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. जळगाव येथील मेळाव्यात खुद्द गुलाबराव वाघ यांनीच जळगाव ग्रामीण मतदारसंघात निवडणुकीत उभं राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने आगामी काळात गुलाबराव वाघ विरुद्ध बंडखोर गुलाबराव पाटील अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे तसेच आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही पाच आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांच्याविरोधात शिवसैनिकांमधून रोष व्यक्त होत आहे. बंडखोरांचे प्रतीक्षा न करता जळगाव जिल्ह्यातही बैठकांच्या माध्यमातून पक्ष संघटनासाठी तसेच जिल्ह्यातील बंडखोरांच्या जागी नवे नेतृत्व उभे करण्याकरता शिवसेना कामाला लागली आहे. जळगाव शहरात शिवसेनेचा मेळावा झाला त्या प्रसंगी गुलाबराव वाघ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
जळगावात गुलाबरावच काय त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार देऊन ते विजयी करु : विलास पारकर
या मेळाव्यात सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, "गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करतोय. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही पक्षात येण्यासाठी ऑफर आली होती. मात्र मी कट्टर शिवसैनिक असल्याने दोघांची ऑफर नाकारली होती. गुलाबराव पाटील यांना मंत्री करण्यातही माझा सिंहांचा वाटा होता. मात्र गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे लोक तोंडावर आपल्याला बोलून दाखवत असून मला त्याची लाज वाटत आहे. मात्र आता सर्व विसरुन शिवसैनिकांनी कामाला लागला पाहिजे. जिल्ह्यात शिवसेना पुन्हा उभारायला चार ते पाच वर्षे लागतील मात्र आता जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामधूनच कोणी नगराध्यक्ष तर कोणी लोकप्रतिनिधी तयार होईल."
हे सांगत असतानाच गुलाबराव वाघ यांनी मला जर पक्षप्रमुख यांचे आदेश आले तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात उभा राहिन आणि विजयी होऊन दाखवेन, असा विश्वासही व्यक्त केला. आता यामुळे आगामी काळात निवडणुकांमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव वाघ विरुद्ध बंडखोर गुलाबराव पाटील सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.