Jalgaon Police : जळगावातील (Jalgaon) एका हॉटेलमधील पोलिसांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस टिमकी या पारंपारिक वाद्याच्या तालावर नृत्य करताना पाहायला मिळत आहे. याचवेळी एकमेकांवर पैशांची ओवाळणी अन् पोलिसांचा हॉटेलमध्ये झिंगाट डान्स सुरु (Zinggat dance) असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 


जळगाव पोलीस (Jalgaon Police) पुन्हा एकदा चर्चेत आले असून आता एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वतीने शहरातील बियर बारमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मद्यप्राशन तसेच जेवण केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी याच हॉटेलात टिमकी वाजवणाऱ्या वादकाला बोलावून घेत टिमकीच्या तालावर नृत्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. नृत्य करणारे हे काही पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे (Jalgaon Taluka Police) कर्मचारी असून तर एक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. तर व्हिडीओत दिसणाऱ्यांपैकी एक ते दोन जण हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे खाजगी व्यक्ती असल्याचे समजत आहे. नेमकं कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांने पार्टीचं आयोजन केलं आणि पोलिसांच्या पार्टीचे निमित्त काय? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.


दरम्यान, रात्रीच्या वेळी हॉटेलात नृत्य करताना पोलीस कर्मचारी एकमेकांच्या अंगावरून पैशाची ओवाळणी करत वादकाला पैसे देत असल्याचेही या व्हिडीओत दिसून येत आहे. एक ते दोन महिन्यांच्या काळातीलच हा व्हिडीओ (Video Viral) असल्याचं सूत्रांकडून सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये नृत्य करताना दिसून येणाऱ्या  एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विश्वनाथ गायकवाड असून तो तालुका पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्याचे समजते आहे. या गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याला दोन दिवसांपूर्वीच अवैध वाळू व्यवसायात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या नृत्य करतानाचा हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


बियरबारमध्ये मद्य प्राशन करून अशा प्रकारचे नृत्य करणे पोलीस खात्याला अशोभनीय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असून या कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विधानसभेच्या अधिवेशनात असो की पत्रकार परिषदेत अनेकदा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव पोलिसांवर हप्ते खोरीसह अनेक गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळालं. पोलिसांचा धाकच राहिला नाही, असंही वेळोवेळी एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता पोलिसांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Police Dance : पोलिसांच्या हिरोगिरीला वेसण, सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी