Gauri Aavahan 2022 : घरोघरी गणपती (Ganesh Chaturthi 2022) विराजमान झाले आहेत. गणपतीच्या उत्साहानंतर आज गौराईंचा (Gauri) आवाहन सोहळा आहे. खान्देशात देखील मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने गौराईंचे आवाहन झाले आहे. अनेक घरात विधिवत पूजन करून गौरीची स्थापना केली जात असून, गौरी स्थापना केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी लाभत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे
खान्देशात घरोघरी सोनपावलांनी गौरींचे जल्लोषात आवाहन
विघ्नहर्ता गणरायाचे धुमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवात प्रारंभ झाला आहे. या आनंदात आणखी वाढ करणाऱ्या गौरींचेही आज (शनिवारी) सोनपावलांनी आवाहन झाले. लक्ष्मी सुख-समृद्धीनं आली, लक्ष्मी कशाने आली, लक्ष्मी माणिक-मोत्यांनी आली,’ असे म्हणत वाजत गाजत उत्साहाच्या वातावरणात घरोघरी आज मोठ्या उत्साहात गौरींची स्थापना करण्यात आल्याचे पहायला मिळाले.
लाडक्या बाप्पांचे बुधवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची चाहूल लागली होती. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात असल्याचे पाहायला मिळते. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती. यासाठी महिला गेल्या काही दिवसांपासू विविध कामात मग्न होत्या. अखेर शनिवारी जळगाव जिल्ह्यासह खान्देशात घरोघरी पारंपारिक पध्दतीने आणि सोनपावलांनी गौरींचे आगमन झाले. घरातील कुटुंबातील सर्व लहान थोर या उत्सवात सहभागी होतात. महिला अगदी नटून सजून गौरींचे स्वागत करत असतात. तीन दिवस या उत्सवामुळे घरात मोठ्या आनंदाचे वातावरण असल्याचे महिला सांगतात.
गौरीचे स्वागत कसे करावे?
गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.
महत्वाच्या बातम्या :