Ganesh Chaturthi 2022 : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. सार्वजनिक मंडळांतर्फे यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने जल्लोषात बाप्पाची आराधना केली जात आहे. गणेशमंडळाच्या सामाजिक, वैज्ञानिक संदेश देणाऱ्या आरासही आपल्याला पाहायला मिळत आहेत. जळगावात आझाद सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळातर्फे 'आध्यात्माला विज्ञानाची जोड' या आशयाने चक्क जगभरात लौक‍िक असलेल्या इस्त्रोची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या ठिकाणी रॉकेट, चंद्रयानाच्या, मंगलयानाच्या लक्षवेधी अशा प्रतिकृती साकारण्यात आल्या असून ते पाहण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. 


यंदा मंडळाचं 30 वं वर्ष


जळगाव शहरातील बळीरामपेठ येथील आझाद सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्या वतीने 1995 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातोय. यंदा मंडळाचे 30 वं वर्ष आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक विषयावर लक्षवेधी आरास साकारण्यात येत असते आणि नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून मंडळाच्या वतीने विज्ञान, आर्मी, देशहित या अनुषंगाने आरास उभारण्यात येत असून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय. याच पार्श्वभूमीवर यंदा मंडळाच्या वतीने विज्ञाननगरी उभारण्यात आली असून इस्त्रोची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना चंद्रयान, मंगलयान, सॅटेलाईट म्हणजे नेमकं काय? तसेच हे कसं काम करतं? याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तसेच मनोबल वाढावं, वैज्ञानिक तयार व्हावेत या उद्देशातून इस्त्रोची प्रतिकृती साकारण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अश्विन भोळे सांगतात.


अज्ञान दूर करण्याचं काम विज्ञान करत असते, मंगळग्रह असेल किंवा चंद्र असेल यावर पोहोचण्यामागचं जे विज्ञान आहे, ते नागरिकांना विद्यार्थ्यांना कळावं, या संकल्पनेतून यंदा विज्ञाननगरी साकारण्यात आली आहे. जळगाव औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांचेही कलाकौशल्य सर्वांसमोर यावे म्हणून त्यांनाही या माध्यमातून संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी चंद्रयान, मंगलयानाच्या हुबेहुब प्रतिकृती साकारल्या आहेत. यात एकाचवेळी 106 उपग्रह आकाशात सोडून विश्वविक्रम करणारे जीएसएलव्ही मार्क 3 ची सुध्दा प्रतिकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साकारली असून ही विज्ञाननगरी नागरिकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.


महत्वाच्या बातम्या :