जळगाव : धरणगावमध्ये काल शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी अभिवादन केलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे शिवसैनिकांनी (Shiv Sena) आज दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले आहे. गद्दारांचा महापुरुषांच्या पुतळ्यास स्पर्श झाल्याने शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे काल प्रथमच जळगावात आले होते. त्यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले होते. परंतु, याच पुतळ्यांचे शुद्धीकरण आज शिवसैनिकांनी केले आहे.
गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून धरणगावमध्ये शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून पुतळ्यांचे शुद्धीकरण केले, अशी माहिती शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.
गुलाबराव वाघ म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर यांनी करोनाच्या काळात चांगलं काम केलं. त्यामुळे संपूर्ण जगभरातून उद्धव ठाकरे यांचं कुौतुक केलं, सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन कौतुक केलं. परंतु, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून 40 जणांनी गद्दारी केली. गद्दारी करणाऱ्यांमध्ये काही मंत्री होते, आताही त्यातील काही मंत्री झालेत. मग गद्दीरी करून त्यांनी काय मिळवलं? गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. पण गेल्या दोन महिन्यांपासून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली होत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी निष्ठावंत मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य उभा केलं. परंतु, या गद्दारांनी आपली निष्ठा विकली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. "
गुलाबराव पाटील यांनी काल जळगावमध्ये आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचे पूजन करून अभिवादन केले होते. मात्र, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना हा अधिकार नसल्याचं सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही स्मारकांचे दुग्धाभिशेकाने शुध्दीकरण करून निषेध व्यक्त केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी धरणगावात ज्या- ज्या पुतळ्यांना अभिवादन केले होते, त्यांचे शुद्धीकरण शिवसैनिकांकडून करण्यात आले. बंडखोरी केल्यामुळे गुलाबराव पाटील यांच्याविरोधात धरणगातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत.