Jalgaon News Update : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शिवसेनेला (shivsena) मोठे खिंडार पडले आहे. महिन्याभरापूर्वी महादेवाच्या पिंडींवर हात ठेवून शपथ घेतलेले पाचोरा तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह शंभर समर्थकांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटाला पाठींबा दिला असून समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं पाटील यांनी म्हटले आहे. रावसाहेब पाटील यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाने शिंदे गटात प्रवेश केल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महादेवाच्या पिंडींवर हात ठेवून घेतली होती निष्ठेची शपथ
रावसाहेब पाटील यांची कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. तालुकाप्रमुख ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा प्रवास आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड पुकारल्यानंतर स्वतंत्र गट स्थापन केला. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याची शपथ घेतली होती.
25 जून रोजी पाटील यांनी ही शपथ घेतली होती. यावेळी आपण उध्दव ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होते. मात्र, या निष्ठेच्या शपथ घेण्याला 24 दिवस उलटत नाही तोच रावसाहेब पाटील हे आज शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या