मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाकडे आहे. यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांचे नाव फायलन असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून हे मंत्री उद्या शपथ घेणार आहेत. 


राज्य मंत्रिमंडळाचा उद्या सकाळी शपथविधी होणार असून त्यामध्ये 18 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या मंत्र्यांची यादी ठरली असून टप्प्याटप्प्याने त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. 


शिंदे गटामध्ये मंत्रीपदासाठी जोरदार चुरस असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यामध्ये आता उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी बाजी मारली असून त्यांचे नाव फायनल झाल्याचं समजतंय. 


अब्दुल सत्तारांचा पत्ता कट?


शिंदे गटाकडून सुरुवातीपासून अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण टीईटी प्रकरणात अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने उद्या होण्याऱ्या विस्तारामध्ये त्यांना स्थान देण्यात आलं नसल्याची चर्चा सुरू आहे.


उद्या होणारा विस्तार हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यामध्ये इतरांना स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. 


दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) बुधवार, 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून याबाबत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, 9 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार  9 ऑगस्ट ते गुरुवार, 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या