Jalgaon Gold News : आज धनत्रयोदशीचा (Dhanteras 2022) दिवस. धनत्रयोदशीच्या निमित्ताने जळगावमध्ये (Jalgaon) सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार आज सकाळपासूनच ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील वर्षी याच दिवशी सोन्याचे दर हे 53 हजार रुपये प्रति ग्रॅम इतके होते. यंदा मात्र जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत देखील पाहायला मिळत असल्याने आज हे दर 51 हजार रुपये प्रति ग्रॅम इतके कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने सोने खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे.   


गेल्या दोन वर्षांचा काळ पाहता कोरोनाच्या (Covid-19) महामारीमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र, कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले असल्याने व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात हजार रूपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना मात्र हा मुहूर्त अधिकच फायदेशीर ठरला आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत ग्राहकांची सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. 


धनत्रयोदशीच्या निमित्ताने केलेली सोने खरेदी ही बरकत देणारी तर असतेच शिवाय शुभ असल्याची अनेक ग्राहकांची श्रद्धा असल्याने या मुहूर्तावर अनेक ग्राहक आज सोने खरेदीचा मुहूर्त साधताना पाहायला मिळतात.


ग्राहकांमध्ये मोठा उत्साह :


दरम्यान, ग्राहकांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली असता ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एका ग्राहकांनी असं म्हटलं की, 'धनत्रयोदशीच्या निमित्ताने आमच्या घरी सोने खरेदी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करणे बरकत देणारे मानले जाते.' तर दुसऱ्या ग्राहकांनी असं म्हटलं आहे की, ही एक चांगली गुंतवणूक देखील असल्याने आम्ही आजचा मुहूर्त साधण्यासाठी आलो आहोत.' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. 
या मुहूर्ताच्या निमित्ताने आज सकाळ पासूनच ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीचा मुहूर्त साधण्यास गर्दी केल्याचं सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे. मागील वर्षी पेक्षा यंदा भाव कमी असल्याने आणि कोरोनाचे सावट नसल्याने दिवसभर सोने व्यावसायाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा भंगाळे ज्वेलर्सचे संचालक आकाश भंगाळे यांनी व्यक्त केली आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Gold Silver Rate : धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांना सोनं-चांदी स्वस्त मिळणार की महाग? वाचा आजचे दर