जळगाव: जळगावात (Jalgaon) एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्या एका जणाला नागरिकांनी चोप दिला आहे. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. शौकत अली अब्दुल गफ्फार (वय 42) रा. कासमवाडी असं व्हिडीओ काढणाऱ्या संशयित व्यक्तीचं नाव असून त्याच्याविरोधात पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
जळगावातील रहिवासी तरुणी एका खासगी बँकेत नोकरीला आहे. बुधवारी (6 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास शौकत अली नामक व्यक्ती बँकेत आला, त्याने कर्मचारी तरुणीशी बोलता बोलता तरुणीचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार कर्मचारी तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरड सुरू केली, घटनेनंतर नागरिकांनी शौकत अली यास पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. घडलेल्या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी कर्मचारी तरुणीच्या तक्रारीवरुन शौकत अली विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात एकाच रात्री तिघांच्या हत्या
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. भुसावळ तालुक्यात 2 सप्टेंबरला दोन वेगवेगळ्या घटनांत एकाच रात्रीच तिघांच्या हत्या झाली आणि या घटनेने परिसरात खळबळ उडाली. भुसावळ शहरालगत असलेल्या कंडारी गावात पूर्व वैमनस्यातून दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील सराईत गुन्हेगार निखिल राजपूतची हत्या करण्यात आली होती.
दोन सख्ख्या भावांची हत्या
भुसावळ शहर एकाच रात्रीत झालेल्या तिहेरी हत्याकांडाने हादरलं होतं. दोन सख्या भावांसह एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ पसरली. रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे आणि राकेश भोलानाथ साळुंखे या दोन सख्ख्या भावांवर अज्ञातांनी चाकूने आणि तलवारीने वार करत हत्या करण्यात आली.
घटनेला काही तास उलटताच आणखी एक हत्या
या घटनेच्या काही तासानंतर श्रीराम परिसरात निखिल राजपूत याची मेव्हण्यानेच गळ्यावर वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आपल्या बहिणीला सोडून अन्य महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून निखिल राजपूतची हत्या करण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलं. निखिल राजपूत हत्या प्रकरणी आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :