जळगाव : 'जालना (Jalna) येथील उपोषण करणाऱ्या लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पुरुष, महिला, लहान मुले जखमी झाले. शेतकरी, शेतमजूर अनेकांवर लाठीहल्ला करण्यात आला. राजकारण्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. आय़ाबहिणींवर लाठीहल्ला करण्याची ज्यांची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही, या सगळ्यांचा आपण शंभर टक्के पराभव करू, या लढाईसाठी आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज जळगाव (Jalgaon) शहरात जाहीर सभा पार पडली. या सभेच्या प्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीला सरकारला जबाबदार धरत जोरदार निशाणा साधला. सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती असून जळगाव जिल्हा देखील या दुष्काळाच्या छायेत आहे. सध्या राज्यभरात महागाई, बेरोजगारी असे असंख्य प्रश्न असून शेतकऱ्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, ही स्थिती बदलायची आहे. ही स्थिती एकदम बदलू शकत नाही. राज्यकर्ते जर आपल्या हातातील सत्तेचा योग्य वापर करतील तर ही स्थिती बदलू शकते. आज राज्य आणि केंद्राची सत्ता ज्या भाजपच्या (BJP) हातामध्ये आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल काहीच वाटत नाही. दुष्काळग्रस्तांबद्दल काहीच वाटत नाही, प्यायला पाणी नाही, त्याची चिंता वाटत नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आज राज्यावर आली आहे, हे सारं का आहे. तर चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेल्यामुळे हे झालं आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला. 


शरद पवार पुढे म्हणाले की, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तब्बल 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबू शकत नाहीत? शेतकरी आत्महत्या का करत आहे, याचा तपास राज्य सरकारने करणं महत्त्वाचं आहे 1984-85 मध्ये जळगाव ते नागपूर दिंडी काढण्यात आली. पहिल्या दिवशी हजार लोक होते. दुसऱ्या दिवशी 25,000 लोक झाले. तिसऱ्या दिवशी 50 हजार लोक जमा झाले. चौथ्या दिवशी एक लाख लोक जमा झाले आणि नागपूरपर्यंत लाखोंचा जत्था या दिंडीत सहभागी होता. त्यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक यांचं राजकारणात महत्वाचं स्थान असतं. त्याला कुठलीही ठेच पोहोचता कामा नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले. 


भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण 


तसेच आज राज्यात-केंद्रात मोदी साहेबांचं राज्य आहे, पण मोदी साहेबांनी काय केलं? नऊ वर्षात इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडणे, राष्ट्रवादी फोडणे, फोडाफोडीच राजकारण आणि दुसऱ्या बाजूला आपल्या हातात जी सत्ता आहे, ती लोकांच्या बाजूंने न वापरता ईडीचा वापर करायचा, लोकांना वेठीस धरायचे काम भाजप करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. अनिल देशमुख हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. काहीही संबंध नसताना काही महिने त्यांना तुरुंगात राहावं लागलं, अनेकांना याचा अनुभव आला आहे. नवाब मलिक जुना नेता, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. लोकांनी दिलेली सत्ता लोकांच्या सन्मानासाठी कशी वापरता येईल हे पाहणं महत्वाच आहे, मात्र भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचं शरद पवार म्हणाले.


इतर महत्वाची बातमी : 


Sharad Pawar : लाठीचार्ज झाल्याचं सर्वांनी बघितलं, कोणी केला, का केला हे तपासणं सरकारचं काम, शरद पवारांचा सवाल