Jalgaon Crime : जळगावात (Jalgaon) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत काल (1 जून) भरदिवसा दरोडा (Robbery) पडला. हेल्मेटधारी दोन दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकावर हल्ला करुन बँकेतील 17 लाख रुपयांची रोख रकमेसह तीन कोटी रुपयांचे सोनंही लुटून नेलं. इतकंच नाही तर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा (CCTV Camera) डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.
तीन कोटींचं सोनं आणि 17 लाखांची रोकड लुटले
कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काल सकाळी बँक उघडताच दरोडा पडला. सकाळी दहा वाजता बँक उघडताच हेल्मेटधारी दोन तरुण बँकेत शिरले. त्यांनी कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत आणि मॅनेजर राहुल महाजन यांच्यावर चाकूने वार करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर त्यांच्याकडून लॉकरची चावी मिळवली. गोल्ड लोनसाठी बँकेतील लॉकरमध्ये असलेले तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर पळवला
यावेळी दरोडेखोरांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बँकेवर दरोडा टाकला. आपली ओळख पटू नये यासाठी दरोडा टाकताना त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलं होतं. तसंच बँकेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यास आणखी कोणती अडचण होऊ नये यासाठी डीव्हीआर देखील पळवून नेला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.
अवघ्या काही मिनिटांचा थरार
हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यांनी बँकेतील 17 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरोडेखोरांना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
जळगाव शहरातील गेल्या अनेक दिवसातील हा सर्वात मोठ्या रकमेचा दरोडा असल्याचं कळतं. त्यामुळे याचं गांभीर्य ओळख या दरोड्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं बनवली असून ती विविध ठिकाणी रवाना केली आहे. मात्र आरोपींची ओळख पटेल असा कोणताही पुरावा प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याने या दरोडेखोरांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
संबंधित बातमी
Jalgaon Crime : जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा, चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लांबवले, चोरटे पसार