जळगाव : "मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आजचं मरण उद्यावर ढकललं," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde)जरांगेंना काय सांगितलं याबाबत उत्सुकता आहे. घटना दुरुस्त करुनच आरक्षण देता येऊ शकते, त्यामुळे याबाबत काय चर्चा झाली आणि महिन्याभरात सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेऊ शकणार का, असे प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत. ते जळगावात (Jalgaon) बोलत होते.


सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण सोडलं


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांदे यांनी उपोषण सोडलं. यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.


मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री


मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची जबाबदारी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडताना व्यक्त केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून कोणत्याही समाजावर अन्यान होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


'सुनावणी पुढे ढकलणं म्हणजे आमदारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न'


दरम्यान शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी पुढे ढकलणे म्हणणे अपात्र होणाऱ्या आमदारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्षांनी पुढे ढकलली आहे. ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी असे न्यायालयाचे निर्देश आहेत. सुनावणी नियमित होणे आवश्यक होते. मात्र यामध्ये वेळ काढण्याचे धोरण दिसत असून अपात्र होणाऱ्या आमदारांना संरक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. ताबडतोब या प्रकरणाची सुनावणी व्हायला हवी, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा


Manoj Jarange Patil : चार कॅबिनेट मंत्री, एक केंद्रीय मंत्री, स्वत: मुख्यमंत्री, आमदार-खासदार, उपोषण सोडताना जरांगेंच्या मंचावर कोण कोण?