जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला (Jansanwad Yatra) आज नाशिकच्या दिंडोरीपासून (Dindori) सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुलाबी यात्रा म्हटली जाते. मात्र, कुणाचा रंग हा लकी असतो. अजित पवारांची यात्रा गुलाबी म्हटली जाते तर योगायोगाने माझेही नाव गुलाब आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
अजित पवारांचा आम्ही आदरच करतो : गुलाबराव पाटील
दरम्यान, अजित पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली असती तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सोबत आणलं असतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पूर्वीच माझी राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. पण मी मागे राहिलो, असे वक्तव्य केले होते. याबाबतही मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, अजित पवार हे सीनियर आहेच. आम्ही त्यांचा आदर करतो. अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. सकाळी सकाळी सुद्धा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे अजित पवारांचा आम्ही आदरच करतो, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतील वाहनांना गुलाबी रंग
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. या यात्रेतील बसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट्स परिधान केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या