जळगाव : पक्षाने संधी दिली तर आपण संधीचं सोनं करू असं सांगत विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचे पुतणे आणि भाजपचे कार्यकर्ते रोहित निकम (Rohit Nikam) यांनी जळगाव शहरातून इच्छुक असल्याचं जाहीर केलं. जळगावात ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याच्याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. रोहित निकमांच्या घोषणेनंतर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. 


जळगाव शहरातून भाजपकडून गेल्या दोन टर्मपासून सुरेश भोळे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळीही तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जळगाव शहरातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. आता त्यात प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचीही भर पडलीय. पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण संधीचे सोनं करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.


आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट तयार


आमदार सुरेश भोळे यांनी त्यांच्या काळात चांगलं काम केले आहे. मात्र स्थानिक तरुणांना याच ठिकाणी आयटीमधून रोजगार देण्याच्या बाबत तसेच शेतीमधून रोजगार निर्मिती करण्याबाबत आपल्याकडे ब्लू प्रिंट तयार असल्याचं रोहित निकम यांनी म्हटलंय.


पक्षाचा आदेश पाळणार


रोहित निकम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक उमेदवार होतो. मात्र पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नसली तरी आपण नाराज न होता पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम केलं. यावेळीही पक्ष जो आदेश देईल त्याचं आपण पालन करणार आहोत. पक्षाच्या धोरणाच्या बाहेर जाऊन आपण कोणतेही काम करणार नाही. 


उज्ज्वल निकम पुन्हा सरकारी वकील


लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला. मात्र पराभव झाल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना सरकारने नव्याने बक्षीस दिलं. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत. 


ही बातमी वाचा: