जळगाव : जळगावात (Jalgaon News) एका गो शाळेत चक्क गाईच्या शेणापासून गणपती मूर्तीची निर्मीती करण्यात येत आहे. या मूर्तींना मोठी मागणी सुद्धा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे पूर्णपणे नैसर्गिक संसाधन म्हणजे शेणापासून ही मूर्ती बनविलेली आहे.  तसेच या मूर्तीसाठी वापरलेले रंगसुध्दा नैसर्गिक असल्याने पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.


गायीचे शेण आणि गोमूत्र याचे पावित्र आपल्याला माहित आहेत. त्याचप्रमाणे शेणापासून बनविलेल्या या मूर्तीचं आध्यात्मिक, वैज्ञानिकदृष्या अन्यन्य साधारण महत्व आहे. गायीपासून मिळणाऱ्या गोमूत्र तसेच शेणाचा वापर केला तर घरात सात्विकता येते असे या शेणाच्या मूर्तीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. शेणाच पावित्रं महत्व लक्षात घेवून एरंडोल शहरालगत असलेल्या समर्पण गोशाळा गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेणापासून गणपती मूर्ती बनविण्याचा उपक्रम राबवित असल्याच पहायला मिळत आहे. योगेश पाटील त्यांचे बंधू रवी पाटील व त्यांचे कुटुंबिय समर्पण गो-शाळा चालवित आहेत. गोशाळेत तब्बल 60 पेक्षा अधिक गायी आहेत. त्यांच्या चारा पाण्याचा खर्च निघावा यासाठी गोशाळेतील गायीच्या शेणापासून मूर्ती बनविण्याची कल्पना योगेश पाटील यांना सुचली. 


 गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेणापासून मूर्ती बनविण्याच काम समर्पण गोशाळेच्या माध्यमातून केलं जात आहे. मूर्ती बनविण्याची ही प्रक्रिया पाहिजे तेवढी सोपी नव्हती. तब्बल दोन वर्ष प्रयत्न करुन तसेच अभ्यासाअंती आकर्षक तसेच चांगल्या पध्दतीचं मूर्ती साकारण्यात योगेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं आहे. नऊ इंच, बारा इंच आणि सोळा इंच अशा तीन आकारात मूर्ती बनविली जाते. या कामातून तब्बल 15 ते 16 जणांना रोजगार सुध्दा मिळाला आहे. गेल्या वर्षांपेक्षा जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात यंदा मूर्तीची मागणी पाचपट वाढल्याने लाखोंची उलाढाल सुध्दा याद्वारे होत असून समर्पण गोशाळा व्यवसायाच्या दृष्टीकोनातून स्वावलंबी झाल्याचेही पहायला मिळत आहे. 


प्रत्येकाला शेणापासून बनविलेल्या या मूर्तीमागचं,आध्यत्मिक व वैज्ञानिक कारण लक्षात आलं किंवा महत्व पटलं, तर या या गोबर गणेशाची घरोघरी स्थापना होवून यंदाच्या गणेशोत्सवात प्रदूषण टाळता येईल. त्यामुळे खऱ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल, यात शंका नाही.