Jalgaon News Update : जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे. कारने दिलेला धडकेत सायकलस्वार चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. विक्रांत संतोष मिश्रा (वय, 11 रा. एकनाथ नगर, मेहरून ट्रॅक जवळ ) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की या घटनेत कारच्या धडकेनंतर चिमुकला चेंडू सारखा हवेत उडाला. त्यातच त्याचा गाजीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धडक देणाऱ्या कारमधील तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रांत मिश्रा हा वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा, आई रिचा यांच्यासोबत जळगावात राहत होता. विक्रांत हा मेहरूण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. आज रविवार असल्याने विक्रांतला शाळेत सुट्टी होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरापासून जवळ असलेल्या मेहरूण ट्रॅकवर त्याच्या काकाचा मुलगा सुनिल जितेंद्र मिश्रा याच्यासोबत गेला होता. यावेळी मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये रेस लागली होती. या रेसमधील एका कारने ( क्रमांक , एमएच 19 बीयू 6006) विक्रांतला जोरदार धडक दिली. या धडकेत विक्रांत जागीच ठार झाला. कारच्या धडकेनंतर चिमुकला चालवत असलेली सायकल झाडावर अडकली होती.
दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर विक्रांत चेडूंसारखा 12 ते 15 फूटवर उडाला होता. त्याची सायकल झाडावर अडकली होती. घटना घडल्यानंतर जवळच्या नागरिकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषीत केले.
मिश्रा परिवारावर दु:खाचा डोंगर
या घटनेमुळे परिसरातील नागरिक सुन्न झाले होते. जिल्हा रूग्णाालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. मयत मुलाच्या पश्चात आई रिचा आणि वडील संतोष गिरीजाप्रसाद मिश्रा असा परिवार आहे. संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात तर त्यांचा डी.जे. रिपेअरींगचा व्यवसाय आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने मिश्रा परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.