Maharashtra Jalgaon News: जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मदतनिधी पिडितेच्या कुटुंबाच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाणार आहे.


जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना 30 जुलै 2023 रोजी घडली होती. यात संशयित आरोपी म्हणून स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याला अटक करण्यात आली आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. पाचोरा येथे 12 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबास शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल. अशी घोषणा केली होती. 35 दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी या घोषणेची प्रतिपूर्ती केली आहे‌. 


महाराष्ट्र शासनाकडून पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांचा मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच मदतनिधी धनादेश गोंडगाव येथे जाऊन दिला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून (Murder) केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे गोडगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमधून संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.  या मोर्चामध्ये भडगाव तालुक्यातील विविध गावांमधील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष तसेच तरुण हे सहभागी झाल्याचे पाहायाला मिळाले. या घटनेतील संशयित तरुणाला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी भडगाव तालुक्यातील अनेक गावांमधील हजारोच्या संख्येने नागरिकांनी आज पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. मूक मोर्चा असल्याने कुठलीही घोषणाबाजी न करता मूक पद्धतीने हा मोर्चा गोंडगाव गावातून थेट भडगाव शहरातील पोलीस ठाण्यावर पोहोचला.


पिडीत मुलीच्या मृत्यूने पिडीतेच्या आई वडीलांसह सर्व गाव सुन्न झाल्याचे पहायला मिळत आहे. मोर्चाचा पोलीस स्टेशनजवळ समारोप झाला, जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत याठिकाणाहून जाणार नाही, असा पावित्रा मोर्चात सहभागी पिडीतेच्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी घेतला. त्यावर या मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमीत पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पिडीतेच्या कुटुंबियांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलंण करुन दिलं.