Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (Jalgaon District Cooperative Milk Producers Union) मंगळवारी (2 ऑगस्ट) गिरीश महाजन (Girish Mahajan) समर्थक प्रशासक मंडळ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे संचालक मंडळ आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दिवसभराचा दोन्ही गटांमधील सत्ता संघर्षाचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात प्रशासक मंडळाने जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे.


प्रशासकीय मंडळातील सदस्य अरविंद देशमुख यांनी ही तक्रार दिली आहे. संचालक मंडळ बरखास्त असतानाही मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील 11 संचालकांनी अनधिकृतरित्या दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूध संघाच्या मीटिंग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीद्वारे व्यक्त केली असून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे म्हटले आहे.


जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील सत्ता संघर्ष शिगेला
जळगाव जिल्हा दूध संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) या अध्यक्ष आहेत. गेल्या सात वर्षांच्यापासून एकनाथ खडसे गटाचे संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत होते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन गट सक्रिय झाला. त्यानंतर जळगाव जिल्हा दूध संघातील खडसे गटाचे संचालक मंडळ विविध आरोपाच्या आणि मुदत संपल्याच्या कारणास्तव बरखास्त करण्यात आले होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय मंडळाने दूध संघात ताबा मिळवला होता. या घटनेनंतर खडसे गटाच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याने दोन्ही गट दूध संघावर आपलीच सत्ता असल्याचं सांगत आहेत.


मीच अध्यक्ष आणि माझेच संचालक मंडळ कार्यरत : मंदाकिनी खडसे
यानंतर काल संचालक मंडळ आणि प्रशासक मंडळ दूध संघात आल्याने नक्की सत्ता कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला. संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याचे आपल्याला अद्याप अधिकृतरित्या कळवलेले नसल्याने आणि आपण स्वतः अध्यक्ष असताना कोणालाही पदभार दिला नसल्याने तूर्तास आपण अध्यक्ष आहोत आणि आणि आपले संचालक मंडळही कार्यरत असल्याचं मंदाकिनी खडसे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. त्यामुळे दूध संघातील हा सत्ता संघर्ष आगामी काळात चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


संबंधित बातम्या


Eknath Khadse : शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना धक्का, जळगाव दूध संघाचं प्रशासक मंडळ बरखास्त, खडसे म्हणाले...