जळगाव:   भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील 80 जण नेपाळ येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी खैरनी नदीमध्ये एक बस कोसळून अनेक जणांचा मृत्यू  झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र आपल्या परिवारातील लोक सुखरुप आहेत की नाही याची माहिती अजून या परिवाराला मिळाली नाहीये.  नेपाळ बस दुर्घटनाप्रकरणी (Nepal Bus Accident)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत संवाद साधला आहे. वायूसेनेच्या विमानाने आज  27 जणांचे मृतदेह महाराष्ट्रात आणणार आहे. 


नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात झालाय.  बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40  जण होते. नेपाळमधल्या पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला आहे.  मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसरातले आहेत.  हे प्रवासी 16 ऑगस्टपासून देवदर्शनाला गेले होते.. 


हेल्पलाइन नंबर जारी


नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी काठमांडू स्थित भारतीय दूतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा नंबर जारी करण्यात आला आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी +9779851107021 जारी केलेला हेल्पलाइन नंबर आहे.  


10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये


महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारच्या दिवशी, काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. सशस्त्र पोलिस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.


आज मृतदेह महाराष्ट्रात येणार


 केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री  शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायूसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.  


हे ही वाचा :


जळगाववर दु:खाचा डोंगर, एकाच तालुक्यातील 14 भाविकांचा मृत्यू; गावात महिलांनी फोडला टाहो