जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे मेळावे आणि नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे शिवसेनेच्या शिव संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकार, मोदी सरकार आणि न्यायालयावरही हल्लाबोल केला. शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात न्यायलयीन लढा सुरू असून अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण, न्यायालयाकडून याप्रकरणावरील अंतिम सुनावणीलाही तारीख पे तारीख मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 शिवसेना आमदारांनी महायुतीसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह व 40 आमदारांच्या अपात्रेबाबत न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही निर्णयावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) अंतिम सुनावणी झाली नाही. त्यामुळे, न्यायालयाकडून होत असलेल्या विलंबावर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सातत्याने भाष्य करताना दिसून येतात. तर, आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट सर्वोच्च न्यायालयास टाळं ठोकण्याची भाषा केली आहे. अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे, तीन वर्षे झाले तरी कोर्टात न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावायला पाहिजे, हे सरकार घटनाबाह्य असल्याचे नायाधीश सांगत आहेत, मात्र निकाल देत नाहीत, हा अंधा कानून आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईवर संताप व्यक्त केला आहे.


मोदी शाह यांच्यावरही हल्लाबोल


चारशे पार झाले असते तर यांनी घटना जाळून टाकली असती. पण, राज्याने त्यांना ब्रेक दिला, मराठी माणसाच्या नादी लागू नका, तो पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही,आता ठिणगी पडली आहे, त्याचा वणवा देशात पसरला आहे, असेही राऊत यांनी म्हटले. आम्हाला तुरुंगात टाकले,आम्ही वाकलो नाही. जे पळून गेले त्यांनी शिवाजी महाराज यांचं नाव लावू नये ते कलंक आहेत. राज्यावर भांडवलदारांचे संकट आहे, रोजगार नाही, मुंबईची अवस्था भिकारी सारखी केली जात आहे, प्रती मुंबई तिकडे उभी केली जात आहे. मोदी शहा हे नेते नाहीत, तर क्रूर व्यापारी आहेत. या राज्यात कोण सुखी आहेत? शेतकरी आत्महत्या करत आहेत, विद्यार्थी रस्त्यावर, महिला सुखी नाही, महागाई वाढली, पंधराशे रुपये तोंडावर फेकले म्हणून कोणी सुखी होणार नाही, राज्य फक्त लुटण्यासाठी चालवत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 


हेही वाचा


जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती