जळगाव : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नक्की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Sharad Pawar Group) की भाजपमध्ये आहेत? असा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. यावरून आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर नाव न घेता केली आहे.
लोकसभा निवडणुकीआधीच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र लोकसभा निवडणूक होऊन देखील त्यांचा पक्ष प्रवेश रखडल्याचे दिसून आले. त्यातच काल एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळाल्याने चर्चांना उधाण आले. काल पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी माझा भाजपा प्रवेश झाला. मात्र, घोषणाच झाली नसल्याचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका
एकनाथ खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे एकनाथ खडसे आहेत. तीस वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही. खडसे म्हणतात आज मी भाजपमध्ये उद्या राष्ट्रवादीमध्ये आधी सुनेला लोकसभेत पोहोचवले. त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे एकनाथ खडसे आहेत, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. भाजपाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
आणखी वाचा