मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर आता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष फोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अचानक राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अन् शरदचंद्र पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहेत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. प्रवेशाच्या चर्चेला खुद्द गुलाबराव देवकर यांनी देखील दुजोरा दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार गटासाठी हा जळगाव जिल्ह्यातून आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
कोणत्या कारणामुळे अजित पवारांसोबत जाणार?
पक्षांतराबाबत एबीपी माझाशी बोलताना गुलाबराव देवकर म्हणाले, गेली अनेक वर्ष आपणसत्तेपासून दूर राहिल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती, त्यांच्यांसाठी आपल्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढताना आपला पराभव झाल्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपण सत्तेत सहभागी व्हायला पाहिजे असा पवित्रा घेतला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आपण येत्या सोमवारी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार आहोत. या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या सोबत बोलणे झाले आहे. शरद पवार गटाला सोडून जात असलो तरी त्यांच्यासोबत या विषयावर अद्याप कोणतेही बोलणे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
तटकरेंसोबत भेटून चर्चा झाल्याची माहिती
गुलाबराव देवकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. देवकर यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. तसेच या भेटीदरम्यान देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश घेण्याची तयारी दाखवली आहे. यासह तटकरे यांनीही देवकरांच्या प्रवेशाबाबत सकारत्मकता दर्शविली आहे.सोमवारी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार आहोत. या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या सोबत बोलणे झाले आहे, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.