Anil Patil on Sharad Pawar : मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. यावरून शरद पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आता मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
अनिल पाटील म्हणाले की, सूनेबाबत शरद पवार यांनी केलेलं विधान आपल्याला कळले नाही. कोणतीही सून आपल्याघरात आल्यानंतर तिला लेकीप्रमाणे वागविण्याची आपली संस्कृती आहे. तर लेकीलाही सासरी लेकीप्रमाणे वागविले जायला हवे.
सुनेला तिरस्काराच्या वागणुकीचे वक्तव्य येत असेल तर ते चुकीचे
सूना या बाहेरच्या असतात असे सांगणे कुठेतरी चुकल्यासारखे वाटते. महिलांना प्राधान्य देणाऱ्या शरद पवार यांनी असे वक्तव्य करणे अपेक्षित नव्हते. केवळ पुत्र प्रेम राहील म्हणून आपल्या सुनेला तिरस्काराच्या वागणुकीचे वक्तव्य येत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन या राज्यात कोणीही करू शकत नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.
पवारांच्या पक्षातील विचार खडसेंना पटले नसतील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावर अनिल पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे अडगळीत पडलेले आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाने घेतले, त्यांना आमदार केले. हे जरी खरे असले तरी सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात काहीच नेते उरलेले आहेत. त्यांचे विचार खडसे यांना पटले नसतील म्हणूनच एकनाथ खडसे यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असावा, असे वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
अनिल पाटलांचा उन्मेष पाटलांना टोला
भाजपमधून उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षात गेल्याच्या संदर्भात बोलताना अनिल पाटील यांनी म्हटल आहे की, उन्मेष पाटील यांचं स्वतःचे असे कोणतेही कर्तुत्व नाही. मोदी यांच्यामुळे ते खासदार झाले होते. खासदार झाल्या नंतरही त्यांनी कोणतेही कर्तुत्व दाखवले नसल्याने त्यांचं पक्षाने तिकीट कापले आहे. दोन चार कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ शकतात. ज्या कार्यकर्त्यांचा आपल्या मतदार संघात प्रभाव नाही असेच कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ शकतात. मात्र,असंख्य कार्यकर्ते हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत, हा भाजपाचा मोठा फायदा आहे.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
पक्षातून जाणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. महायुतीची ताकद वाढत असल्याचं सगळीकडे पाहायला मिळते आहे. महाविकास आघाडीमध्ये केवळ घोळ झाला असे नाही तर त्यांचे कार्यकर्ते एकमेकाला पाडण्यासाठी एकमेकाचे शत्रू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे बोर्ड पुसले जात आहेत. धुळ्यात जागा जाहीर होताच काँग्रेस उमेदवारांनी राजीनामे दिल्याचं पाहायला मिळत असून आगामी निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत असल्याचे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा