Anil Patil on Eknath Khadse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत रविवारी ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून आता राजकारण चांगलेच रंगले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, असे म्हटले आहे. आता यावरून मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. 


मोदींच्या कार्यक्रमाला महिला भगिनींचा प्रचंड जनसमुदाय


मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमासाठी येत आहेत. याबाबत विचारले असता अनिल पाटील म्हणाले की, महिला भगिनींचा प्रचंड जनसमुदाय आज इथे पाहायला मिळत आहे. साधारण दीड लाखापर्यंत महिलांची संख्या असू शकते. महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. महिला आनंदाच्या भरात साधारण तीन ते चार किलोमीटर लांब पार्किंगपासून असूनही सभास्थळी पायी पोहोचत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले.  


अंबादास दानवे राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोध करताय


पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून जळगावसाठी रवाना होणार होते. मात्र, विमानतळपरिसरात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आंदोलन केले. याबाबत विचारले असता अनिल पाटील म्हणाले की, अंबादास दानवे यांना आता केवळ विरोधाला विरोध करण्याची आवश्यकता वाटत आहे. ज्यासाठी ते आंदोलन करत आहेत त्यावर आधीच कार्यवाही झालेली आहे. मात्र, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ते विरोध करत असल्याची टीका अनिल पाटील यांनी केली. 


खडसेंचं निमंत्रण आता सोयीनुसार असणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी आमदारांना निमंत्रण देणे आवश्यक असताना एकनाथ खडसेंना निमंत्रण देण्यात आले नाही, असे विचारले असता अनिल पाटील म्हणाले की, आमंत्रण हे सर्वांना दिलेले आहे. त्यांनी ते स्वीकारावे की नाही हा त्या आमदारांचा प्रश्न आहे. प्रोटोकॉल म्हणून सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मी निमंत्रणाची यादी स्वतः वाचलेली आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की, मी निमंत्रण नसल्यामुळे कार्यक्रमाला येणार नाही. याबाबत विचारले असता अनिल पाटील म्हणाले की, त्यांचं निमंत्रण आता सोयीनुसार असणार आहे. मात्र त्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे, असा टोला त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला.


आणखी वाचा 


Eknath Khadse: वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे