जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण रंगले आहे. शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्व आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते. तरीही मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी 12 वाजता प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर लखपती दीदी संमेलन पार पडणार आहे. मोदी सकाळी 10 वाजता छत्रपती संभजीनगर विमानतळावर दाखल होतील. जळगावात सकाळी 11.15 ते  12  या वेळेत ते बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते इंडस्ट्रीयल पार्कवरी कार्यक्रमस्थळी दाखल होतील.


तत्पूर्वी नेपाळमधील दुर्घटनेत जळगावमधील 30 जणांचा मृत्यू झाला. यापैकी अनेकांचे मृतदेह रविवारी वरणगाव येथे आणण्यात आले. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम रविवारी नियोजित असल्याने या मृतदेहांवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे वरणगावमध्ये शोकाकुल वातावरण होते. एकनाथ खडसे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 


पहिल्या बसमधील भाविक सुखरुप


नेपाळमध्ये देवदर्शनासाठी जळगावच्या वरणगावमधील अनेकजण गेले होते. यापैकी एक बस दरीत कोसळली होती. तर दुसऱ्या बसमधील भाविक सुखरुप आहेत. त्यांना गोरखपूर येथून विशेष विमानाने जळगावला आणण्यात येईल. काल आणण्यात आलेल्या मृतदेहांसाठी 26 स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.  नातेवाकांसोबत हे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत नेले जाणार आहेत.


एकनाथ खडसे भाजपमध्ये की शरद पवार गटात?


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडलेला नाही. अशात मोदींच्या कार्यक्रमाला न बोलावल्याने एकनाथ खडसे हे नक्की भाजपमध्ये की शरद पवार गटात? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. खडसे यांचे कट्टर राजकीय वैरी गिरीश महाजन हेदेखील सातत्याने या मुद्द्यावरुन खडसे यांना टोले लगावताना दिसतात. अलीकडेच त्यांनी, 'खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे. पण एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कोणालाच माहीत नाही', अशी टिप्पणी केली होती.


आणखी वाचा


नेपाळमधील बस अपघातात माझा बालमित्र हरपला, मित्राच्या आठवणीनं नाथाभाऊ गहिवरले; वरणगावकडे 26 अँब्युलन्स रवाना


नेपाळमधील अपघातात मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह जळगावात दाखल, 26 अँब्युलन्स वरणगावकडे होणार रवाना