नागपूरः पत्नी आणि पत्नीची बहीण त्रास देत असल्याचे लिहून पतीने आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासाठी हेतुपुरस्सर त्रास देणे गरजेचे असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोन बहिणींना दिलासा मिळाला आहे. पतीच्या आत्महत्येनंतर दोघींविरूद्ध बल्लारशा (जि. चंद्रपूर) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.


पोलिसांनी तपास पूर्ण करून दोन्ही बहिणींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. दाखल केलेला गुन्हा व दोषारोप पत्र रद्द करावे, या विनंतीसह या दोन बहिणींनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, आरोपींनी कधीही मृतकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही. किंबहुना त्याला कोणताही त्रास दिला नाही. मृत व्यक्ती दारूचा व्यसनी होता. पत्नीसह मेव्हणीने 'दारू पिऊ नको' असे त्याला समजावले होते.


मुख्य म्हणजे आरोपींनी हेतुपुरस्सर मृतकाने आत्महत्या करावी या हेतुने त्याला त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. त्याशिवाय भारतीय दंड विधानाच्या कलम 306 अंतर्गत गुन्हा होऊ शकत नसल्याचे म्हटले. तसेच, दोघींविरोधात दाखल दोषारोपपत्र न्यायालयाने खारीज केले.


कोणता त्रास दिला, याचा उल्लेखसुद्धा नाही


दाखल दोषारोप पत्र रद्ध करण्याची विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली होती. ती आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद आणि दोषारोपपत्राचे अवलोकन उच्च न्यायालयाने केले. यावरून आपले निरीक्षण नोंदविताना, आरोपींनी मृतकास आत्महत्येस प्रवृत्त केले, असा कोणताही पुरावा नाही. नेमका कोणता त्रास आरोपींनी मृतकास दिला, याचा उल्लेखसुद्धा पत्रामध्ये आढळला नाही.


इतर महत्वाच्या बातम्या


Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा, कारण अद्याप अस्पष्ट


CNG Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ


मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये म्हणून शिवसेनेची धावाधाव; राज्यपालांनी इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये, शिवसेनेचं राज्यपालांना पत्र