सोलापूर: ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी राजीनाम्याची नोटीस दिली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. 7 जुलै रोजीच त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं पत्र दिलं असल्याचं समोर आलं असून राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. 


डिसले गुरुजींनी आपल्या राजीनाम्याचं पत्र माढा तालुक्यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिला असून त्यामध्येही राजीनाम्याचं कारण दिलं नाही. त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी त्यांचा राजीनामा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती आहे. 


काही महिन्यांपूर्वी डिसले गुरुजी आणि शिक्षण विभागामध्ये वाद झाला होता. रणजित डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. त्यामुळे त्यांना अमेरिकेला जायचं होतं. त्यामध्ये शिक्षण विभागाच्या काही नियमांची आडकाठी येत होती. आता डिसले गुरुजींनी राजीनामा दिला तो या कारणामुळे आहे की आणखी काही कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. 


कोण आहेत रणजित डिसले? 
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले
- QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम
- कार्याची दखल घेत त्यांना 4 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- जून 2021 मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली
- शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून 20 नोव्हेंबर 2021 रोजी मानद डॉक्टरेट प्रदान
- 1 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- याच स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे.


काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?
- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप 
- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर 
- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
-  लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.