मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये म्हणून आता शिवसेनेची धावाधाव होताना दिसत आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं जैसे थेचा निर्णय देत कोणतीही कारवाई शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारावर करता येणार नाही असे आदेश दिले. आता शिवसेनेकडून राज्यपालांना एक पत्र पाठवण्यात आलंय. कोर्टाच्या निर्णयानुसार यापुढे मंत्रिमंडळ विस्तार करु नये, असे या पत्रात म्हटले आहे.


शिवसेनेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोर्टाच्या निर्णयानुसार यापुढे मंत्रिमंडळ विस्तार करु नये आणि तसं केलं तर ते घटनाबाह्य होईल. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले सरकारही बेकायदेशीर आहे. जास्तीत जास्त हे सरकार काळजीवाहू होऊ शकतं. यापुढे घटनाबाह्य काहीही करु नका. त्यामुळे आता शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 


संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय काल दिलाय त्यावरच हे पत्र दिले आहे. जेणेकरून कुठलंही घटनाबाह्य काम निर्णय घेतला जाऊ नये. सध्याचे सरकार हे बेकायदेशीर आहे. 


राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन अस्सलाम वालेकुम अशा शब्दात संवाद साधला. याविषयी  बोलताना संजय राऊत म्हणाले, मला याविषयी माहित नाही. उद्धव ठाकरेंना फोन आला असेल जर उद्धव ठाकरे बोलत असतील तर हे खरं असेल.  कदाचित राजनाथ सिंह यांना मेहबूबा मुफ्ती यांना फोन लावायचा असेल त्यांच्या ऑपरेटरने चुकून मातोश्रीवर फोन लावला असेल. 


उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होत असेल तर आपल्याला आनंद आहे असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "या आधी प्रतिभा पाटील यांना आणि त्यानंतर प्रणब मुखर्जी या यूपीएच्या उमेदवारांना शिवसेनेने एनडीएपेक्षा वेगळा निर्णय घेतला होता. आताही शिवसेना तशीच वेगळी भूमिका घेत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करत आहे."