Madras High Court : मद्रास हायकोर्टाने घटस्फोटाच्या खटल्यात आपला निर्णय देताना पती किंवा पत्नीने एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे हे क्रूरता असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस सौंथर यांच्या खंडपीठाने सी.शिवकुमार यांच्या घटस्फोटाला परवानगी दिली. खंडपीठाने सांगितले की, पत्नी श्रीविद्याला पतीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे तिने कार्यालयात जाऊन धिंगाणा घातला.


विद्याने कोणताही पुरावा नसतानाही शिवकुमारविरोधात तक्रारही दाखल केली होती. हे सर्व मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. 


पतीच्या ऑफिसमध्ये जाऊन अश्लील भाषा वापरली


कोर्टाने सांगितले की, श्रीविद्या तिच्या पतीची चौकशी करण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. जिथे तिने शिवकुमार यांच्यावर विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. खंडपीठाने म्हटले आहे की, श्रीविद्याचे हे कृत्य हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(ia) अंतर्गत मानसिक क्रूरता आहे. असे करून तिने आपल्या पतीची प्रतिमा खराब केली जी सुधारणे शक्य नाही.


याआधी कौटुंबिक न्यायालयाने शिवकुमार यांचा घटस्फोटाचा अर्ज क्रुरतेच्या कारणावरून फेटाळला होता, त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.


शिवकुमार हे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत


सी. शिवकुमार हे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर पत्नी श्रीविद्या सरकारी शाळेत शिक्षिका आहे. 10 नोव्हेंबर 2008 रोजी दोघांचे लग्न झाले होते. दोघे जेमतेम अडीच वर्षे एकत्र राहिले. शिवकुमार यांचे महिला प्राध्यापिकेशी अनैतिक संबंध असून रात्री उशिरापर्यंत ते फोनवर बोलायचे, असा आरोप श्रीविद्याने तिच्या तक्रारीत केला होता.
जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार देत श्रीविद्याने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी एकत्र राहण्याची मागणी केली होती.


शिवकुमार यांचा आरोप, पत्नीने मंगळसूत्र फेकून दिले होते


न्यायालयात सुनावणीदरम्यान शिवकुमार यांनी असेही सांगितले की, त्यांच्या पत्नीने 2011 पासून मंगळसूत्र घातलेले नाही. संबंध तोडून तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकले. यावर श्रीविद्या म्हणाली होती की, मंगळसूत्र काढल्याने नाते तुटत नाही. ते काढून टाकल्याने विवाहावर परिणाम होऊ नये.


हा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने म्हटले की, मंगळसूत्रासारखे पवित्र चिन्ह काढून टाकण्याचा वेगळा अर्थ आहे. यावरून असे दिसून येते की श्रीविद्याला लग्न टिकवायचे नव्हते. त्यामुळे दोघांचा घटस्फोट मंजूर झाला आहे.