Pune Accident News: पुण्याच्या (Pune) आंबेठाण (Ambethan) येथे तीन बहीण भावंडांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात तिन्ही भावंड खेळण्यासाठी उतरले आणि त्यातच बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. राकेश, रोहित आणि श्वेता किशोर दास अस मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून 4 ते 8 अशी त्यांची वय होती.


नक्की काय घडलं?


आज सकाळी आई आणि या तिघांचा सहा महिन्यांचा भाऊ घरात होता. तर वडील कामावर गेले. त्यावेळी ही तिघे पावसाच्या पाण्यात खेळत होते. खेळता खेळता एका शेतातील खड्ड्यात उतरले. मात्र अंदाज न आल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यांनी बाहेर निघण्याचा बराच वेळ प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल झाल्याने तिघांचा पाण्यात गुदमरुन जीव गेला. या घटनेने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर सगळीकडे ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. 


अनेकदा  शेतात अनेक कामांसाठी खड्डे खोदले जातात. काम झाल्यानंतर ते खड्डे तसेच ठेवले जातात. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचते. त्यामुळे खड्याचा अंदाज घेता येत नाही मुलांचं वय लहान असल्याने त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती. तिघेही खेळण्यासाठी गेले आणि जीव गमावून बसले. या घटनेनंतर  शेतात खड्डे असल्यास ते बुजवून अथवा त्या बाजूला कुंपण करण्याचं आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलं आहे.


भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू


पुण्यात इमारतीच्या बांधकामाच्या जागेला लागून असलेल्या दुकानाची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पुण्यातील गणेश पेठेतील हमजेखान चौकात घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढले होते. अडकलेला व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर जखमी असल्याने काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.