बेंगळुरु : ऑनलाईन खाद्य पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कर्मचाऱ्यावर नुकतंच एका मॉडेल आणि मेकअप कलाकारावर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता आणि त्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून आरोप करणाऱ्या हितेशा चद्रानीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हितेशा चंद्रानी हिने झोमॅटो कंपनीच्या कामराज या डिलिव्हरी बॉयवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या प्रकरणात झोमॅटो कंपनी आणि कर्मचारी कामराजवर देशभरातून टीका केली गेली. नंतर कामराजने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला कसं खोटं पाडलं जातंय आणि कसा बळीचा बकरा केला जातोय याची कथा मांडली होती.
त्यानुसार आता मॉडेल आणि मेकअप कलाकार असणाऱ्या हितेशा चंद्रानीवर आयपीसी कलम 355, कलम 504 आणि कलम 506 असे अनुक्रमे हल्ला, अपमान आणि धमकी या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरुच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये कामराजने ही तक्रार दाखल केली आहे.
सुरुवातीला झोमॅटो कंपनीवर या प्रकरणात टीका होत असताना नंतर कामराजच्या वतीने सत्य सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्याच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा उतरली आहे. कामराजला कोणत्या माध्यमातून मदत करु शकू असं तिने विचारलं होतं.
झोमॅटो कंपनीने कामराजची बाजू घेत तो एक चांगला कर्मचारी असल्याचा दाखला दिला होता. त्यानंतर कामराजने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप खोडून काढले. संबंधित महिलेने केवळ खाद्यपदार्थ डिलिव्हरी करण्यास वेळ झाल्याने आपल्याला मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप केला होता.
संबंधित बातम्या :
- झोमॅटोवरून दर मिनिटाला 22 बिर्याणींची ऑर्डर, तर जळगावच्या ग्राहकाने मागवले सर्वाधिक पिझ्झा
- लॉकडाऊनच्या काळातही तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवणारी 'ती' सहा नावं
- Food Waste Index Report | जगात दरवर्षी 17 टक्के खाद्यपदार्थ वाया जातात, त्यामुळे वातावरण बदलाच्या समस्येत वाढ