मुंबई : बिर्याणी ही खरोखरच भारतीयांची आवडती डिश आहे, असं दिसून येतंय. झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरून लोकांनी लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बिर्याणी ऑर्डर केली. झोमाटोच्या माहितीनुसार, वर्ष 2020 महामारीच्या काळात दर मिनिटाला बिर्याणीच्या किमान 22 ऑर्डर मिळाल्या. झोमॅटोच्या 2020 च्या अहवालानुसार आऊटलाईन ट्रेंडमध्ये पिझ्झा सर्वात जास्त आवडता होता.


झोमाटोच्या माहितीनुसार मे महिन्यात पिझ्झाच्या 4.5 लाखाहून अधिक ऑर्डर मिळाल्या. ज्यात जुलैपर्यंत 9 लाखांपर्यंत वाढ झाली. सप्टेंबरपर्यंत ही संख्या 12 लाखांवर आणि नोव्हेंबरमध्ये 17 लाखाहून अधिक पिझ्झाच्या ऑर्डर आल्या. जळगाव येथील एका ग्राहकाने यावर्षी सर्वाधिक 369 पिझ्झा मागवले आहेत.


बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि पुणे येथे मोमोजला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. मोमोजला याठिकाणी 25 लाख वेळा ऑर्डर केले गेले. दिल्लीत इतर शहरांपेक्षा मोमोजच्या ऑर्डर जास्त आहेत. काही लोकांनी झोमॅटो अॅपवर काही विचित्र पदार्थांचाही शोध घेतला. 414 लोकांनी अ‍ॅपवर 'बॅट सूप' शोधलं. झोमॅटोवर सर्वाधिक ऑर्डर बंगळुरुमधील यश नावाच्या व्यक्तीकडून आल्या आहेत. त्याने 2020 मध्ये 1380 ऑर्डर दिल्या. त्याच्याकडून दररोज सुमारे चार ऑर्डर येत असत.


किंमतीनुसार सर्वात महाग ऑर्डर सुमारे 2 लाख रुपयांची होती. या ऑर्डरची किंमत 1 लाख 99 हजार 950 रुपये होती तर यावर 66,650 रुपयांची सूट मिळाली. तर सर्वात स्वस्त ऑर्डर 39.99 रुपयांची होती आणि सूट मिळाल्यानंतर तिची किंमत 10.01 रुपये होती. झोमॅटोच्या प्रो मेंबरशिप प्रोग्रामच्या एका मेंबरने 1 लाख 94 हजार 233 रुपयांची सूट मिळवली आहे.


गुलाबजामून हा देशाचा आवडता मिष्टान्न म्हणून उदयास आला आहे. गुलाबजामूनच्या जवळपास एक लाख ऑर्डर केवळ दिवाळीच्या आठवड्यात देण्यात आल्या. 2020 मध्ये गुलाबजामूनच्या मुंबईत सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. चंढिगडमध्ये मध्यरात्री सर्वाधिक ऑर्डर दिल्या गेल्या. मुंबईच्या डिलिव्हरी पार्टनर्सना सुमारे 4.6 कोटी रुपयांच्या टिप्स मिळाल्या, त्यानंतर गोव्यातील 20 जणांनी 2000 रुपये टिप म्हणून दिले.