ABP News-CVoter Opinion Poll 2021: कोरोना काळातील देशातील सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम मार्च-एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. यात पाच राज्यात निवडणुका होणार असून कोट्यवधी लोक आपल्या मताधिकाराचा वापर घरुन लोकशाहीला अजून मजबूत करतील. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. आसाम वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये बिगर-भाजप सरकार आहे. या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगालची सर्वाधिक चर्चा आहे. दरम्यान, या पाच राज्यांचा मतदारांचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजने सी-व्होटरसमवेत मतदारांचा कल जाणून घेतला.


पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी येथे एका टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार असून पाच राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.


मागील वेळी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीने 211 जागा जिंकल्या होत्या. यावेळी टीएमसी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करीत आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की यावेळी बंगालच्या लोकांनी परिवर्तन करण्याचा विचार केला आहे. भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा ते दावा करीत आहे. तर काँग्रेस-डावी आघाडी आणि आयएसएफची महायुतीदेखील सरकार स्थापनेचा दावा करीत आहेत. बंगालमधील एकूण 294 जागांसाठी आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत.


पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं पुढे, पण..
पश्चिम बंगालमध्ये 2016 मध्ये टीएमसीला 44.9 टक्के मते मिळाली होती, असा अंदाज वर्तविला जात आहे की यावेळी ही मते दीड टक्क्यांनी कमी होऊन 43.4 टक्के होऊ शकतात. याचा फायदा भाजपला होताना दिसून येत आहे. मागील वेळी 10.2 टक्के मते मिळाली होती, ती यावेळी वाढून 38.4 टक्के होण्याचा अंदाज आहे, म्हणजेच 28.2 टक्के फायदा होत आहे. तर सर्वात जास्त नुकसान काँग्रेस आणि डाव्या आघाडीला होताना दिसत आहे. मागील वेळी त्यांना 37.9 टक्के मते मिळाली होती, यावेळी केवळ 12.7 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे उणे 25.2 टक्के नुकसान होणार आहे. गेल्या वेळी इतरांना 7 टक्के मते मिळाली होती, तर यावेळी साडेपाच टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे दीड टक्के कमी झाली आहेत.


पश्चिम बंगालमध्ये भाजप टीएमसीला जोरदार टक्कर देताना दिसत असली तरी सत्ता टीएमसीचीच येताना दिसत आहे. सीव्हीओटरच्या ओपन पोलनुसार टीएमसीला 150 ते 166 जागा मिळू शकतात. भाजपला 98 ते 114 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. काँग्रेस आणि डाव्यांच्या जागा 23 ते 31 जागांवर येऊ शकतात. तर 3 ते 5 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.