Zika Virus Case Found in Karnataka: तब्बल दोन वर्षाच्या प्रादुर्भावानंतर देशातील कोरोनाचा आलेख हळूहळू शून्याकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात आता झिका व्हायरसनं (Zika Virus) डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर (Pune) आता कर्नाटकात (Karnataka) झिका व्हायरसची (Zika Virus Case) लागण झाल्याच्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तिला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर (Karnataka Health Minister K. Sudhakar) यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. कर्नाटकातील रायचूर (Raichur) जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, झिका व्हायरसची (Zika Virus Symptoms) लागण झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. मात्र, रुग्णाची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून लवकरच याबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Zika Virus Case Found in Karnataka: 5 डिसेंबरला तीन नमुने पाठवण्यात आले
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुण्याच्या लॅबमधून आम्हाला मिळालेल्या अहवालात पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 5 डिसेंबर रोजी कर्नाटकमधून रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यासोबतच आणखी 2 नमुने पाठवण्यात आले आहेत. इतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ज्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ती पाच वर्षांची मुलगी आहे. सध्या आरोग्य विभाग या मुलीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळले होते."
Zika Virus Case Found in Karnataka: राज्य सरकार अलर्टमोडवर
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "सरकार खबरदारी घेत असून रायचूर आणि शेजारील जिल्ह्यांतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्गाची प्रकरणं आढळल्यास झिका विषाणू चाचणीसाठी नमुने पाठविण्यास सांगितलं आहे. सध्या ज्या मुलीमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे, तिनं देशाबाहेर प्रवास केलेला नाही. आतापर्यंत या विषाणूची ही एकच केस आहे. असं असूनही प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे."
Zika Virus: झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
Zika Virus Symptoms: झिका व्हायरसची लक्षणं
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारांसाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.