नवी दिल्ली : अनेकजण आपल्या मेहनतीची कमाई, सोबतच मौल्यवान वस्तू जसं की, सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्येच ठेवणे पसंत करतात. कारण, सर्वांनाच वाटतं, या वस्तू घरात ठेवण्यापेक्षा बँकेच्या लॉकरमध्ये अतिशय सुरक्षित असतात. पण हे खरं नाही. कारण, बँकेच्या नियमांनुसार, बँकांच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास, त्याची नुकसानभरपाई बँकेकडून मिळणार नाही.


जर बँकेत चोरी झाली किंवा आग लागली यामुळे तुमच्या बँक लॉकरमधील मौल्यवान वस्तुंचं नुकसान झालं, तर त्याची नुकसान भरपाई म्हणून एक छदामही मिळणार नसल्याचं रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे. माहितीच्या आधिकारा खाली आरबीआयने याबाबतचा खुलासा केला आहे.

बँकेने सांगितलं आहे की, बँकेचं लॉकर भाडे तत्वावर दिलं जातं. त्यावेळेस बँक ही एक भाडे वसूल करणारी संस्था म्हणून काम करते. पण बँकेकडून तुमच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तू चोरीला गेली, किंवा बँकेला आग लागल्याने त्याचे नुकसान झाल्यास, त्याला बँक जबाबदार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

असं करा मौल्यवान वस्तूंचं संरक्षण!

त्यामुळे तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी काही पर्याय शोधावे लागतील. त्यामध्ये तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तूंचा इन्श्यूरन्स उतरवावा. त्यामुळे जर बँकेत चोरी झाल्याने, तुमच्या मौल्यवान वस्तू देखील चोरीला गेल्यास, त्याची भरपाई इन्श्यूरन्स कंपनी देऊ शकते.