नवी दिल्ली : रायबरेली मतदार संघातून 2019 ची लोकसभा निवडणूक आपण लढणार नसल्याचं प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशातील या मतदार संघातून आपण नव्हे, तर सोनिया गांधीच निवडणूक लढतील, असं म्हणत प्रियांका गांधींनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला.

सोनिया गांधी यांनी आजच काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र राहुल गांधींकडे दिली. त्यामुळे आता भावाला राजकारणात सहकार्य करण्यासाठी प्रियांका सक्रीय राजकारणात येतील, असा अंदाज लावला जात होता. शिवाय सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर या अंदाजांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र सोनिया गांधी पदावरुन निवृत्त होत आहेत, राजकारणातून नाही, असं पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.

काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमानंतर प्रियांका गांधींना प्रश्न विचारण्यात आला. ''रायबरेलीतून मी निवडणूक लढण्याचा प्रश्नच नाही. तिथून 2019 ला आईच निवडणूक लढवेल'', असं उत्तर प्रियांका गांधींनी दिलं. शिवाय सोनिया गांधी यांच्या 19 वर्षांच्या कारकीर्दीचं त्यांनी कौतुकही केलं.

काँग्रेसमध्ये राहुल पर्वाची सुरुवात

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधींकडे सोपवल्यानंतर, मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद दिला. सोनियांनी काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. यावेळी त्या इंदिरा आणि राजीव गांधींच्या आठवणीने भावुक झाल्या.

सोनिया म्हणाल्या, " इंदिरांनी मला मुलीसारखं स्वीकारलं, भारताच्या संस्कृतीशी ओळख करुन दिली. 1984 मध्ये त्यांची हत्या झाली, त्यावेळी माझी आई माझ्यापासून दुरावल्याची भावना होती".

यावेळी राजीव गांधींबाबत सोनिया म्हणाल्या, "राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतरच माझा राजकारणाशी संबंध आला, त्यापूर्वी राजकारणाशी माझा संबंध नव्हता. मात्र इंदिरांच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली आणि माझा आधार माझ्यापासून हिसकावला. गांधी घराण्यातील प्रत्येकजण या देशासाठी झिजला आहे".

संबंधित बातम्या :

मुलाचं कौतुक करणार नाही, पण कणखर राहुलचा अभिमान: सोनिया गांधी


तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं राजकारण करु : राहुल गांधी


आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी!