बालाकोट एअर स्ट्राईक
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या बसेसच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या भ्याड हल्लानंतर भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालाकोट परिसरात घुसून तिथल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. यात 250 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा सरकारनं केला होता.
विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं होतं.
तिहेरी तलाक कायदा
प्रदीर्घ चर्चेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं. त्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. या कायद्यामुळे मुस्लीम समाजात तिहेरी तलाक देणे काद्याने गुन्हा ठरणार आहे.
'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते. हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही. या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टात अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली होती.
चांद्रयान 2
2019 वर्षात भारताने अंतराळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं 22 जुलैला प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं. मात्र चंद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. यानंतर सातत्याने 10 दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता. 8 सप्टेंबरला चांद्रयान 2 वरच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यातून लँडर चंद्रभूमीवर असल्याचं दिसलं, असं इस्रोनं सांगितलं होतं.
पण या मोहिमेनंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देशभरातून कौतुक झालं. "मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहिमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने 2008 मध्ये चंद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.
कलम 370
भारताच्या इतिहासातील कलम 370 हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. कलम 370 च्या माध्यमातून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता. यामध्ये कोणत्याही क्षेत्रातील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं गरजेचं होतं. पण नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 रद्द केलं. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरची फेररचना करण्यात आली आणि दोन नवे केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. लडाख हा विधीमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश आला आहे, तर जम्मू-काश्मीर विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश करण्य़ात आले. या निर्णयामुळे एखादा नवा कायदा लागू करायला केंद्राला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसून, राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकणार आहे. तसेच 370 कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्गही मोकळा झाला आहे.
अयोध्या निकाल
अनेक वर्षांपासून अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त (2.77 एकर) जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा देखील निर्णय सुनावला आहे. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला. तीन महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. 2019 च्या मोठ्या घडामोडींमधील ही एक महत्त्वाची घटना मानली जाते.
महाराष्ट्रातील सत्तापेच
महाराष्ट्रातील राजकारणामुळे 2019 वर्षे चर्चेत राहिलं. विधानसभा निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण 80 तासांच्या आतचं अजित पवारांनी राजीनामा दिला आणि सर्वांना धक्का दिला. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आलं. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये 36 मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेसाठीही ही निवडणुक महत्त्वाची ठरली, कारण ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले.
या घडामोडीत एक महत्तावाची गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढले. बहूमतांनी निवडणूक जिंकली पण दोघांनांही एकत्र सत्ता स्थापन करता आली नाही.
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA)
एकीकडे संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यापासून वर्ष अखेर देशभरात मोठा गदारोळ माजला आहे. या कायद्याअन्वये 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, पारशी, ख्रिस्ती, जैन आणि बौद्ध धर्मियांना भारतीय नागरिकत्व देण्याची शिफारस या कायद्यात आहे. मात्र भारतात अवैध मार्गाने घुसलेल्या बांगलादेशी, पाकिस्तानी, अफगाणिस्तानी नागरिकांना मायदेशी परतावे लागणार आहे. तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलने सुरु आहेत. याला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यानं यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. तर पोलीसांसह अनेकजण यात गंभीर जखमी झालेत.