नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज जबाबदारी स्वीकारली आहे. नरवणे यांच्या रुपाने मराठी व्यक्ती देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्याजागी नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवे लष्करप्रमुख म्हणून मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे लष्कराची जबाबदारी असणार आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मनोज नरवणे यांची निवड करण्यात आली आहे. नरवणे हे देशाचे 28 वे लष्करप्रमुख आहेत. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मनोज नरवणे यांच्या रुपाने जवळपास 33 वर्षानंतर मराठी माणसाकडे पुन्हा एकदा लष्कराचे नेतृत्व आलं आहे. 13 लाख अधिकाऱ्यांचा फौजफाटा असणाऱ्या लष्कराचे प्रमुख म्हणून आता लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे काम पाहणार आहेत.
बिपीन रावत भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'
बिपीन रावत यांची लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात सीडीएस म्हणून नियुक्तीची घोषणा सोमवारी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची सूत्रं स्वीकारण्याआधी बिपीन रावत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून तिन्ही दलात समन्वय राखण्याची जबाबदारी बिपीन रावत यांच्याकडे असणार आहे.
नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची ओळख
मनोज नरवणे यांचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेतून झालं. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतलं. शीख लाईट इन्फंट्रीमध्ये जून 1980 मध्ये त्यांनी सुरुवातीला काम केले. लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी 'आसाम रायफल्स'चे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. म्यानमारमध्ये त्यांनी भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदावरुन कोलकातामधील पूर्व कमांडच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली.